
वेगवान मराठी : एकनाथ भालेराव
येवला दिनांक 5मार्च : कांद्याला योग्य हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर टिमक्या वाजवत प्रतीकात्मक धरणे आंदोलन करण्यात आले.
टिमक्यांच्या गजरात व जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे मका हमीभाव केंद्राची मर्यादा वाढलीच पाहिजे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा विविध घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी कांद्याला प्रति क्विंटल ३००० रुपये हमीभाव द्यावा, आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, मका हमीभाव खरेदी केंद्रांची मर्यादा वाढवावी, शासनाने हमीभावाने खरेदी केलेल्या मकाचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, मका विक्रीसाठी सातबारा उताऱ्यावरील पिकपेर्याची अट शिथिल करावी, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, लोडशेडिंग बंद करावे, शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करावी व घरगुती गॅसच्या किमती कमी कराव्यात अशा विविध मागण्या केल्या.
आंदोलनानंतर नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
कांद्याला योग्य हमीभाव मिळाला नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तात्काळ लक्ष दिले नाही, तर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा समीर देशमुख, येवला तालुका काँग्रेस अध्यक्ष यांनी दिला.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या काळात आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, कॉम्रेड भगवान चित्ते, माजी शहराध्यक्ष प्रीतम पटणी, प्रहारचे हरिभाऊ महाजन, बळीराम शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुखदेव मढवई, आबासाहेब शिंदे, विद्याभूषण दुगड, बाबासाहेब शिंदे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. नाना शिंदे, तालुका उपाध्यक्ष मारुती सोमासे, संदीप दारुंटे, दत्तू भोरकडे, श्रावण राजगिरे, फारुख चामडेवाले, शिवाजी निमसे, राजेंद्र घोटेकर, अर्जुन ठोंबरे, पोपट शिंदे, नाना पडवळ, संदीप मंडाळकर, शिवेंद्रादित्य देशमुख, बाबासाहेब पगारे, सतीश शिरसागर, भाऊसाहेब क्षीरसागर, फारुख शेख आदींसह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



