लोकल बातम्या

कुसुमाग्रज जागर-मराठी भाषा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Nandgaon News

कुसुमाग्रज जागर-मराठी भाषा कार्यक्रम उत्साहात संपन्न

वेगवान मराठी :  मारुती जगधने

दिनांक 5 मार्च 2016

–नांदगाव
मराठी भाषेच्या शुद्धतेचा आणि अभिजाततेचा जागर करणारा कुसुमाग्रज जागर–मराठी भाषा हा कार्यक्रम नांदगाव येथे उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगाव आणि छत्रपती संभाजी महाराज वाचनालय गिरणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मराठी भाषेच्या जतन-संवर्धनाचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. जोगेश्वर नांदूरकर यांनी मराठी भाषेतील परकीय शब्दप्रयोगांबाबत खंत व्यक्त करताना सांगितले की, “आपल्या भाषेत समृद्ध शब्दसंपदा उपलब्ध असतानाही आपण ऐट म्हणून किंवा निरुपायाने परकीय शब्द वापरतो. ही बाब विनायक दामोदर सावरकर यांना खटकत असे. म्हणूनच त्यांनी मराठी भाषाशुद्धीचा आग्रह धरत ‘दिनांक’, ‘मेज’, ‘ओळखणी’, ‘खोडणी’ असे शेकडो मराठी प्रतिशब्द रूढ केले.” मराठी शुद्धीची परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रास्ताविकात म.सा.प. अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप व परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला.
कवितावाचनाच्या सत्रात विविध कवी-रसिकांनी प्रभावी सादरीकरण केले. विद्या माळी मॅडम यांनी “सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना” ही प्रार्थना सादर केली. इयत्ता तिसरीतील दिवीज विक्रम घुगे या विद्यार्थ्याने “जीवन” कविता खड्या आवाजात सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विजय काकळीज सर यांच्या “कणा” या कवितेच्या सादरीकरणाने सभागृह भावविवश झाले. पत्रकार संदीप जेजूरकर यांनी “मध्यरात्र उलटल्यावर” तसेच स्वरचित “बाप” कविता सादर करत भावनिक वातावरण निर्माण केले.
म.सा.प.चे कार्याध्यक्ष तथा गझलकार काशिनाथ गवळी यांच्या गझल सादरीकरणाने सभागृह दणाणून सोडले. प्रा. सुरेश नारायणे यांनी “प्रेम कर भिल्लासारखं” ही कविता सादर केली. अलका निकम (“अश्रू”), वैशाली दुसाने (“सागर”), गणेश बागुल (“उठा उठा चिऊताई”), तसेच बी.एड. कॉलेजचे प्राचार्य विक्रम घुगे (“शहाणपण”) यांनीही प्रभावी सादरीकरण केले. पंकज सोनवणे यांच्या “मला कविता करता येत नाही” या स्वरचित कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली. गौरी, मनस्वी व लावण्या यांनीही सहभाग नोंदवून वातावरणात उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास यादवराव काकळीज यांनी बहारदार पद्धतीने केले.
यावेळी कवी काशिनाथ गवळी, ॲड. सचिन साळवे, व्ही.वाय. काकळीज, प्रा. सुरेश नारायणे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले . तसेच बाबुराव मानकरी, ॲड. उमेश उगले, राजेंद्र कुटे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मसाप व छत्रपती संभाजी महाराज वाचनालयाचे पदाधिकारी व सदस्य तसेच पी.एस. अहिरे, आर.के. गवांदे, कृष्णराव देशमुख, निंबा दैतकार, संदीप आहेर, संजय शिवदे, रामदास गागरे, पंढरीनाथ करवर, नंदलाल अहिरे, दिलीप पायमोडे, अशोक मार्कड, जयेश गवळी, डॉ. मुकेश मानकरी, सचिन पगार, ॲड. शिवाजी पाटील, प्रसाद बुरकुल, अक्षदा कुलकर्णी, प्राजक्ता निकम, अलका नारायणे, संगीता काकळीज, मंदा गवांदे, शशीकला मानकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेचा जागर, साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग आणि काव्यरसिकांची दाद यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!