महाराष्ट्र,देश

ऋषीपंथा (बहाळ) येथे आदर्श सत्यशोधक पुनर्विवाह; समाज संघाला सहयोग निधी

Nandgaon (nashik) news

ऋषीपंथा (बहाळ) येथे आदर्श सत्यशोधक पुनर्विवाह; समाज संघाला सहयोग निधी

वेगवान मराठी : मारुती जगधने दिनांक 20 July2026

चाळीसगाव : महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समता, शिक्षण आणि पुरोगामी विचारांचा वारसा जपत ऋषीपंथा (बहाळ) ता. चाळीसगाव येथे रविवारी सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने आदर्श सत्यशोधक पुनर्विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास सुमारे शेकडो नागरिक उपस्थित होते.

पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील सिंधुबाई व कृष्णा नामदेव रोकडे यांचे चिरंजीव पंकज रोकडे आणि तरवाडे (ता. पारोळा) येथील संगीता व वाल्मिक धनराज माळी यांची कन्या नयना माळी यांचा पुनर्विवाह वधू-वरांच्या संमतीने आणि दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

विवाह विधी भगवान रोकडे व विलास माळी यांनी सत्यशोधक पद्धतीने पार पाडला. यावेळी कोणतेही कर्मकांड, मंत्रोच्चार, होम-हवन किंवा हुंड्याची प्रथा न ठेवता वधू-वरांनी समानता, परस्पर विश्वास, शिक्षण आणि समाजसेवेची प्रतिज्ञा केली. उपस्थितांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या प्रसंगी रोकडे परिवाराने सत्यशोधक समाज संघाला २,१०० रुपयांचा सहयोग निधी प्रदान केला. समाजप्रबोधन, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला हातभार लागावा, या उद्देशाने हा निधी दिल्याचे परिवाराने सांगितले.

कार्यक्रमात सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास जाधव, दीपक माळी, माजी चेअरमन विजयकुमार रघुनाथ माळी, कौतिक जगन्नाथ माळी, माजी सरपंच सच्चिदानंद जाधव, दत्तात्रेय नामदेव रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर, महिला व नागरिक उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना कैलास जाधव यांनी सत्यशोधक विवाह ही समता, बंधुत्व आणि शिक्षणाची चळवळ असल्याचे सांगितले. सच्चिदानंद जाधव यांनी वधू-वरांना जबाबदारीने संसार करत मुला-मुलींना शिक्षण देण्याचे आवाहन केले. दीपक माळी यांनी रोकडे परिवाराच्या सहयोग निधीच्या निर्णयाचे स्वागत केले.

विधीकर्ते भगवान रोकडे यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीची माहिती देताना, महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या या पद्धतीत जात-पात, मुहूर्त, कुंडली व अवाजवी खर्चाला स्थान नसून स्त्री-पुरुष समानता, हुंडामुक्त विवाह आणि समाजहित हीच या पद्धतीची खरी ओळख असल्याचे सांगितले.

शेवटी विष्णू नामदेव रोकडे यांनी आभार मानले. साधेपणा, विचार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा पुनर्विवाह परिसरात चर्चेचा विषय ठरला. नवदांपत्य पंकज व नयना यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!