आईच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांच्या हाती लॅपटॉप; पवन पवार यांचा स्तुत्य उपक्रम

देवळा : आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील भऊर पश्चिम जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप भेट देत सटाणा येथील एथर शोरूमचे संचालक पवन पवार यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. त्यांच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.
आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात वावरत आहोत. मुलांचा मोबाईलवरील स्क्रीन टाइम कमीत कमी आणि ठरावीक असावा. मोबाईलवर मुले नेमके काय पाहतात, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. रील्स स्क्रोल करताना पुढील रील काय असेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे मोबाईल जितका उपयुक्त आहे, तितकाच तो धोकादायकही ठरू शकतो. माझ्या मते, मोबाईलच्या तुलनेत लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा वापर अधिक नियंत्रित, सुरक्षित आणि शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या हातात लॅपटॉप देताना मला मनापासून आनंद होत आहे, असे पवन पवार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळांसाठी लोकसहभाग गरजेचा : पत्रकार बाबा पवार
आपण गावाचे आणि समाजाचे देणे लागतो, या भावनेतून पवन पवार यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ लॅपटॉप भेट दिला आहे. जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पवन पवार यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या, तर त्यांच्या गुणवत्तेला आणि क्षमतेला निश्चितच योग्य दिशा मिळू शकते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्यासाठी लोकसहभाग वाढणे गरजेचे आहे, असे पत्रकार बाबा पवार यांनी सांगितले.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देतानाच जिल्हा परिषद शाळांच्या संवर्धनासाठी दातृत्वाच्या भावनेतून पुढे येत पवन पवार यांनी केलेली मदत समाजासाठी निश्चितच अनुकरणीय आहे. असे देखील शेवटी बाबा पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापू पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पवार, संदीप पवार व कवी आबा आहेर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण पवार, भास्कर पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज आहेर, उपाध्यक्ष सागर आहेर, सदस्य गणेश पवार, शरद जाधव, नानाजी पवार, वैभव पवार, संजय आहेर, राजेंद्र पवार, जगदीश पवार, दिनेश पवार आदी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजीव आहेर यांनी केले, तर आभार उपशिक्षक देवाजी बनकर यांनी मानले.



