देवळा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा ; पाणीटंचाई, चारा व पशुधनासाठी पाणी नियोजनाला प्राधान्य देण्याच्या आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या सूचना

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील पाणीटंचाईसह पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी पाणी व चारा नियोजन तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शासनाच्या निर्देशानुसार उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याबरोबरच पशुधनासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना आमदार डॉ. राहुल आहेर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळावा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच शेतकरी व पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत आणि प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
दुष्काळाच्या काळात शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असेही आमदार आहेर यांनी सांगितले.



