नांदगाव महाविद्यालयात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रम उत्साहात ७५ विद्यार्थ्यांनी घेतली निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची प्रतिज्ञा
Nandgaon News

नांदगाव महाविद्यालयात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रम उत्साहात
७५ विद्यार्थ्यांनी घेतली निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची प्रतिज्ञा
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, दि. २३ ऑक्टोबर २०२६ : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद – जागर आरोग्याचा’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आयोजित आरोग्य जागृती व प्रतिज्ञा कार्यक्रमात ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची शपथ घेतली.**
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. डॉ. एस. ए. मराठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. स्वप्नील शेंडगे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून देणे, तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. एस. ए. मराठे यांनी बदलत्या जीवनशैलीचा तरुणांच्या आरोग्यावर होणारा परिणाम विशद केला. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपाय यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थिनी सायली बोरसे हिने उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्यप्रतिज्ञा दिली. यामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि व्यसनांपासून दूर राहणे, तसेच तणावाच्या परिस्थितीत योग्य मदत घेणे यांचा समावेश होता. आरोग्यविषयक माहिती कुटुंबीय, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचाही संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास संकोच न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि आवश्यक ती मदत मिळविणे महत्त्वाचे असल्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. गोकुळ बोरसे व प्रा. बी. पी. मोरे यांनी सहकार्य केले. प्रा. बी. के. पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एम. अहिरे यांनी आभार मानले.
निरोगी जीवनशैलीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम तरुण पिढीमध्ये आरोग्यविषयक जाणीव, सकारात्मक दृष्टिकोन आणि आरोग्यदायी सवयी रुजविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.



