
न्यायडोंगरी उपबाजारात मका लिलावाचा शुभारंभ
मक्याला कमाल २,६७१ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव; शेतकऱ्यांना रोख पेमेंट देणार – सभापती एकनाथ सदगीर
वेगवान मराठी | मारुती जगधने
नांदगाव / न्यायडोंगरी, दि. १३ ऑक्टोबर २०२६ : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या न्यायडोंगरी उपबाजारात खरीप हंगामातील नवीन मक्याच्या लिलावाचा शुभारंभ मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) बाजार समितीचे सभापती एकनाथ सदगीर यांच्या हस्ते करण्यात आला. या लिलावात मक्याला किमान २ हजार १८० रुपये, कमाल २ हजार ६७१ रुपये, तर सरासरी २ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
यावेळी न्यायडोंगरी येथील शेतकरी राहुल शंकर राठोड यांनी विक्रीसाठी आणलेल्या मक्याला २ हजार ६०६ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच सदर मका खरेदी करणारे व्यापारी मे. मित ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर राहुल कांतीलाल छाजेड यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर आणि शिवसेना नेते किरण कांदे यांचा सभापती एकनाथ सदगीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच व्यापारी व शेतकरी बांधवांच्या वतीने संचालक दर्शन आहेर, सतीश बोरसे, जीवन गरुड, दीपक मोरे, निलेश इपर, हिरालाल आव्हाड आणि बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यायडोंगरीचे माजी सरपंच नरेंद्र आहेर, विजय आहेर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुमतीलाल दुगड, जोएब तांबोळी, भरत अजमेरा, दत्तू शेवाळे, अंबादास वाघ, पोपट पवार, ज्ञानेश्वर को-हाळे, जालिंदर आहेर, गणेश आहेर, सुपडू साळुंके, साहेबराव आहेर, भावडू निस्ताने यांच्यासह व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या लिलावातच मका विकावा!
न्यायडोंगरी उपबाजारात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे पैसे बाजार समितीच्या कार्यालय परिसरातच रोख स्वरूपात अदा करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मका शिवारात किंवा खासगी व्यापाऱ्यांना परस्पर विक्री न करता बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये लिलावाद्वारेच विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती एकनाथ सदगीर यांनी केले.
तसेच शेतकऱ्यांनी ओला मका विक्रीस न आणता तो व्यवस्थित वाळवून आणि प्रतवारी करून बाजार समितीत आणावा. यामुळे शेतमालाचा दर्जा सुधारून चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.



