नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

बोलठाण उपबाजारात मका लिलावाचा शुभारंभ; कमाल २,७७५ रुपये बाजारभाव!

Nandgaon News

बोलठाण उपबाजारात मका लिलावाचा शुभारंभ; कमाल २,७७५ रुपये बाजारभाव!

सभापती एकनाथ सदगीर यांच्या हस्ते खरीप हंगामातील मका लिलावाचा प्रारंभ; शेतकरी योगेश ढगे यांचा प्रातिनिधिक सत्कार

वेगवान मराठी | मारुती जगधने १३ October२०२६

नांदगाव / बोलठाण, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोलठाण उपबाजारात खरीप हंगामातील नवीन मक्यासह भुसार धान्याच्या लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती एकनाथ सदगीर यांच्या हस्ते सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) उत्साहात करण्यात आला. या लिलावात मक्याला प्रतिक्विंटल किमान १,९०१ रुपये, कमाल २,७७५ रुपये, तर सरासरी २,४५० रुपये बाजारभाव मिळाला.

यावेळी जातेगाव येथील शेतकरी योगेश ढगे यांच्या मक्याला सर्वाधिक २,७७५ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाल्याने त्यांचा बाजार समितीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच हा मका खरेदी करणारे व्यापारी मे. नहार ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर प्रितेश सुभाषचंद्र नहार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक अनिल सोनवणे, व्यापारी संचालक गोकुळ कोठारी, हमाल-मापारी संचालक निलेश इपर, माजी उपसभापती दत्तात्रय निकम, बोलठाण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप पवार, सचिव अमोल खैरनार, बाबासाहेब साठे, आनंदा मोरे, मच्छिंद्र सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील व्यापारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारातच रोख पेमेंट

बोलठाण उपबाजारात शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना बाजार समितीच्या कार्यालयाच्या आवारातच रोख स्वरूपात पैसे अदा केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मका व इतर धान्य शिवारात किंवा खासगी व्यापाऱ्यांना परस्पर विक्री न करता बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये लिलावाद्वारे विक्रीस आणावे, असे आवाहन सभापती एकनाथ सदगीर यांनी केले.

तसेच मक्याला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ओला मका विक्रीस आणण्याऐवजी तो योग्य प्रकारे वाळवून, स्वच्छ करून आणि प्रतवारी करून बाजारात आणावा. यामुळे शेतमालाचा दर्जा सुधारण्यासह चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

बाजार समितीच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी अधिकृत लिलाव प्रक्रियेचा लाभ घेऊन आपल्या शेतमालाची विक्री करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!