आरोग्यनाशिक ग्रामीण

पोखरी शिवारात सहा फूट लांबीचा अजगर आढळला; वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Nandgaon News

पोखरी शिवारात सहा फूट लांबीचा अजगर आढळला;

वेगवान मराठी | मारुती जगधने(२७ October२०२६)

नांदगाव : तालुक्यातील पोखरी शिवारात गणेश दशरथ जाधव यांच्या गट क्रमांक १५० मधील शेतात सुमारे पाच किलो वजनाचा आणि सहा फूट लांबीचा दुर्मिळ अजगर आढळून आल्याने परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. सर्पमित्रांच्या मदतीने या अजगराला पकडण्यात आले. त्यानंतर त्रिश्वार परिसरातील राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४९२ मध्ये त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही नांदगाव तालुक्यातील विविध भागांत दोन ते तीन अजगर सर्पमित्रांना आढळून आले होते. त्यामुळे नांदगाव तालुक्यात अजगरांचे प्रमाण वाढत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः शेतीशिवारात अजगर आढळून येण्याच्या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये कुतूहलासोबतच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पोखरी शिवारात पकडण्यात आलेल्या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यास विलंब झाल्याची चर्चा असून, या प्रकरणामुळे सर्पमित्रांच्या कामकाजाबाबत आणि वन विभागाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

सर्पमित्रांनी साप, अजगर यांसारखे सरपटणारे प्राणी पकडल्यानंतर त्याची तातडीने वन विभागाकडे नोंद करणे आवश्यक आहे. तसेच वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्राण्याला शक्य तितक्या लवकर, सुरक्षित पद्धतीने आणि योग्य अधिवासात सोडणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात या प्रक्रियेचे काटेकोर पालन होताना दिसत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने सर्पमित्रांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत. सर्पांचे विविध प्रकार, त्यांची हाताळणी, बचावकार्यादरम्यान घ्यावयाची खबरदारी, कायदेशीर नियम आणि सुरक्षित अधिवासात पुनर्वसन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि कामाचा अनुभव असलेल्या जाणकार सर्पमित्रांची नोंदणी करून त्यांना आवश्यक प्रमाणपत्र व नियमानुसार अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी होत आहे.

सध्या अनेक सर्पमित्र सामाजिक भावनेतून सर्पांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. मात्र, पुरेसे प्रशिक्षण आणि योग्य साधनसामग्री नसताना साप किंवा अजगर पकडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित सर्पाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर सर्पमित्रांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ उत्साहाच्या भरात सर्प पकडण्याचे काम न करता प्रशिक्षित व्यक्तींच्या मदतीनेच बचावकार्य होणे आवश्यक आहे.

वन विभागाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्पमित्र आणि वन विभाग यांच्यात समन्वय निर्माण करावा. सर्प आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवी सुरक्षितता या दोन्ही बाबींचा विचार करून प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

*अजगरासारख्या वन्यजीवांचे संरक्षण करताना सर्पमित्रांची सुरक्षितता, वन विभागाची जबाबदारी आणि वन्यजीवांचे योग्य पुनर्वसन या तिन्ही बाबींना प्राधान्य देणे काळाची गरज बनली आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!