ई-पीक पाहणीत देवळा तालुका जिल्ह्यात अव्वल; ॲग्रीस्टॅकची ९४.३४ टक्के नोंदणी पूर्ण

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याने ई-पीक पाहणी मोहिमेत आघाडी घेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले असून, आतापर्यंत सुमारे ९५ टक्के क्षेत्रावरील पीक नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पांतर्गत फार्मर आयडी नोंदणीचे कामही वेगाने सुरू असून ९४.३४ टक्के खातेदारांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनाच्या विविध कृषी योजना, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आणि किमान आधारभूत किंमत खरेदीचा लाभ पारदर्शकपणे मिळण्यासाठी दोन्ही नोंदणी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.
ई-पीक पाहणीस ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ
देवळा तालुक्यात एकूण ४८,६५२ खातेदार असून, त्यापैकी ४५,९६५ खातेदारांनी ‘ई-पीक पाहणी’ ॲपद्वारे आपल्या पिकांची यशस्वी नोंद केली आहे. अद्याप २,६८७ खातेदारांची पीक पाहणी प्रलंबित असून, उर्वरित शेतकऱ्यांसाठी शासनाने दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. सातबारा उताऱ्यावर पिकांची अचूक नोंद होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईल ॲपद्वारे किंवा गावातील नेमलेल्या सहाय्यकांच्या मदतीने शेतात जाऊन फोटोसह पीक पाहणी पूर्ण करावी. ज्या गटांना तांत्रिक अडचण येत आहे, अशा गटांची ई-पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी स्तरावर ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन देवळा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.
फार्मर आयडी नोंदणीचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे आवाहन
देवळा तालुक्यातील एकूण ३३,६६९ शेतकऱ्यांपैकी ३१,७६४ खातेदारांनी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीसाठी नोंदणी केली असून, ९४.३४ टक्के खातेदारांना मंजुरी मिळाली आहे. ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक अंतर्गत तालुक्याचे काम चांगले असल्याचे नमूद करत, भविष्यात पीक कर्ज, पीएम-किसान सन्मान निधी, पीक विमा व इतर अनुदान योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य राहणार असल्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि सातबारा उताऱ्यासह नजीकच्या सीएससी / आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा महाराष्ट्र ॲग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन मोफत नोंदणी व ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही आमदार डॉ. आहेर यांनी केले आहे.



