नाशिक ग्रामीण

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे दिवाळीचे ₹५ हजार अद्याप खात्यावर नाहीत! प्रलंबित मदत तातडीने वितरित करा; अन्यथा शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

Nandgaon News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे दिवाळीचे ₹५ हजार अद्याप खात्यावर नाहीत!

प्रलंबित मदत तातडीने वितरित करा; अन्यथा शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

नांदगाव : १३ नोव्हेंबर २०२६
वेगवान मराठी :
मारुती जगधने

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळी सणानिमित्त शासनाने जाहीर केलेली प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची निराशा वाढली असून, प्रलंबित मदत तातडीने वितरित करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नांदगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री व शासनाने दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र, दिवाळीचा सण उलटूनही मोठ्या संख्येने शेतकरी या मदतीपासून वंचित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले असून, आवश्यक माहिती शासन व संबंधित प्रशासनाकडे उपलब्ध आहे. असे असतानाही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न होण्याचे कारण समजण्यापलीकडे आहे. दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना शासनाकडून जाहीर झालेली मदत वेळेत न मिळणे ही गंभीर बाब असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.

तरी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांची मदत तत्काळ जमा करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा आंदोलनाचा इशारा!

शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर मदतीची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात आली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!