नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान पाटील, उपसभापतीपदी अनिल वाघ बिनविरोध
Nandgaon News

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान पाटील, उपसभापतीपदी अनिल वाघ बिनविरोध
मोरझर व पिंप्रीहवेली गावाला प्रतिनिधित्व; आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया
वेगवान मराठी | मारुती जगधने ८ November२०२६
नांदगाव (वेगवान मराठी वृत्तसेवा) : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मोरझर येथील समाधान आनंदराव पाटील, तर उपसभापतीपदी पिंप्रीहवेली येथील अनिल आप्पासाहेब वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या नेतृत्वात झालेल्या या बदलामुळे मोरझर आणि पिंप्रीहवेली गावाला महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.
बाजार समितीचे तत्कालीन सभापती एकनाथ कारभारी सदगीर व उपसभापती यज्ञेश रामनिवास कलंत्री यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने सभापती व उपसभापती पदांच्या निवडीसाठी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
सभापती पदासाठी समाधान आनंदराव पाटील, तर उपसभापती पदासाठी अनिल आप्पासाहेब वाघ यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
सभापती पदाच्या नामनिर्देशन पत्रावर संचालक सतीश विनायक बोरसे यांनी सूचक, तर जीवन साहेबराव गरुड यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. उपसभापती पदाच्या नामनिर्देशन पत्रावर पोपट मांगू सानप यांनी सूचक, तर दीपक सूर्यभान मोरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.
शिवनेरी सभागृहात एकमताने निर्णय
सभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवनेरी सभागृहात बैठक झाली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक तथा आमदार सुहास (आण्णा) कांदे, सौ. अंजुमताई कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार अनिलदादा आहेर आणि विलासभाऊ आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती पदासाठी समाधान पाटील, तर उपसभापती पदासाठी अनिल वाघ यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर अधिकृत निवड प्रक्रिया पार पडली.
मान्यवरांची उपस्थिती
निवड प्रक्रियेवेळी संचालक तेजदादा कवडे, साहेबराव पगार, अर्जुन (बंडू) पाटील, दर्शन आहेर, अनिल सोनवणे, गोकुळ कोठारी, निलेश इपर आदी उपस्थित होते.
तसेच नांदगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सागर हिरे, मजूर फेडरेशनचे संचालक प्रमोद भाबड, माजी संचालक अमोल नावंदर, नुतन कासलीवाल, शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव, उपनगराध्यक्ष वाल्मिक टिळेकर, नगरसेवक काशिनाथ देशमुख, प्रकाश शिंदे, किरण देवरे, जगताप सर, दीपक पांडव, चेतन पाटील, उदय पाटील, राजाभाऊ देशमुख, बाळकाका कलंत्री, भाऊसाहेब काकळीज, पुंजाराम जाधव, दिलीप इनामदार, बाळासाहेब कवडे, भैय्यासाहेब पगार, प्रभाकर कवडे, सुधीर देशमुख, राजेंद्र पवार, गणेश शिंदे आणि बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांच्यासह मोरझर व पिंप्रीहवेली येथील ग्रामस्थ तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन सभापती समाधान पाटील व उपसभापती अनिल वाघ यांचा ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, संचालक मंडळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
छायाचित्र ओळ : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती समाधान पाटील व उपसभापती अनिल वाघ यांचा सत्कार करताना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, संचालक मंडळ व उपस्थित मान्यवर.



