महाराष्ट्र,देश

नांदगाव तालुक्यात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; चार वस्त्यांवर हल्ले, सहा जण गंभीर जखमी!

Nandgaon News

नांदगाव तालुक्यात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; चार वस्त्यांवर हल्ले, सहा जण गंभीर जखमी!

कऱ्ही, सटाणे शिवारातील घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण; दोन जणांची प्रकृती चिंताजनक, पोलिसांकडून पाहणी

वेगवान मराठी | मारुती जगधने ७ नोव्हेंबर २०२६

मनमाड : नांदगाव तालुक्यातील कऱ्ही व सटाणे परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वेगवेगळ्या वस्त्यांवर हल्ले करत चोरट्यांनी लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या व धारदार शस्त्रांनी नागरिकांना मारहाण केली. या हल्ल्यांमध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. या घटनांमुळे ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कऱ्ही येथे दराडे कुटुंबावर हल्ला

रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास कऱ्ही येथे साईनाथ दराडे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. घराची कडी उघडताच ९ ते १० जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड व लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली. मात्र, दराडे यांनी प्रसंगावधान राखत खाट उचलून चोरट्यांवर फेकली. त्यांच्या पत्नीनेही घरातील भांड्यांचा वापर करून प्रतिकार केला. सुमारे पाच मिनिटे संघर्ष सुरू होता. जोरदार प्रतिकारामुळे चोरट्यांनी पळ काढला. पाठलाग करताना चोरट्यांनी दगडफेक केल्याचे वृत्त आहे.

सटाणे शिवारातील लहिरे वस्तीवर घुसखोरीचा प्रयत्न

यानंतर चोरटे सटाणे शिवारातील लहिरे वस्तीवर पोहोचले. हातात काठ्या व लोखंडी गज घेऊन आलेल्या चोरट्यांना पाहून ज्योती लहिरे यांनी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी लोखंडी टामी दरवाजात घालून तो उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्योती लहिरे व त्यांचे पती अमोल लहिरे यांनी आतून दरवाजा दाबून धरला. विजय लहिरे व अंगणवाडी सेविका मैनाबाई लहिरे यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.

पवार वस्तीवर सोन्याचे दागिने लुटले; कुटुंबाला मारहाण

तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी पवार वस्तीवर हल्ला केला. कुसुमबाई अनाजी पवार यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने काढून घेतले. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून दिलीप (बारकू) पवार बाहेर आले. त्यांनी आईला घरात घेऊन दरवाजा बंद केला. मात्र, चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करत मारहाण केली. घरातील आदित्य व सार्थक या मुलांना धमकावून शांत करण्यात आले, तसेच त्यांचा मोबाईल फोडून फेकल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात आशाबाई दिलीप पवार यांच्या कंबरेला दुखापत झाली, तर दिलीप पवार यांच्या हाताला व डोळ्याजवळ मार लागला असून, त्यांना टाके पडले आहेत. जखमींवर मनमाड येथे उपचार सुरू आहेत.

मोरे वस्तीवर धारदार शस्त्राने हल्ला; महिलेच्या डोक्याला ४० टाके

चौथ्या घटनेत चोरट्यांनी मोरे वस्तीवर हल्ला करत शिवाजी एकनाथ मोरे यांना मारहाण केली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. मुलाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या रंजनाबाई मोरे यांच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने वार करण्यात आला. त्यांच्या डोक्याला सुमारे ४० टाके पडले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. दोघांवर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी; ग्रामस्थांची गस्त वाढवण्याची मागणी

या गंभीर घटनांची माहिती मिळताच मनमाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.

कऱ्ही व सटाणे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या सशस्त्र हल्ल्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!