नाशिक ग्रामीण

वीज मंडळाच्या गलथान कारभाराचा फटका❓ आझाद नगर-पिंजारवाडीत १५ ट्रॅक्टर चाऱ्याची राख!

Nandgaon News

वेगवान मराठी : मारुती जगधने ११ November२०२६

वीज मंडळाच्या गलथान कारभाराचा फटका❓ आझाद नगर-पिंजारवाडीत १५ ट्रॅक्टर चाऱ्याची राख!

शॉर्टसर्किटची पूर्वसूचना देऊनही दुर्लक्ष; आप्पा सुपडू काकळीज यांचे लाखमोलाचे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी

आझाद नगर-पिंजारवाडी : वीज वितरण मंडळाच्या कथित गलथान कारभारामुळे आझाद नगर-पिंजारवाडी येथील शेतकरी आप्पा सुपडू काकळीज यांच्या जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे १५ ट्रॅक्टर चारा सारा जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वीज मंडळाच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आठ दिवसांपूर्वीच शॉर्टसर्किटची दिली होती सूचना!

सदर शेतकऱ्याने आठ दिवसांपूर्वीच संबंधित ठिकाणी वारंवार शॉर्टसर्किट होत असल्याची माहिती आझाद नगर येथील वायरमन गायकवाड यांना दिली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित विद्युत तारेला जोडणीच्या ठिकाणी आवश्यक क्लिप नसल्याने तार सहज जोडलेली असल्याचे दिसत होते. या ठिकाणी वारंवार शॉर्टसर्किट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वेळीच विद्युत यंत्रणेची दुरुस्ती केली असती, तर आजची ही मोठी दुर्घटना टाळता आली असती, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

कष्टाने जमवलेला चारा आगीत भस्मसात!

शेतकरी आप्पा सुपडू काकळीज यांनी आपल्या जनावरांसाठी मोठ्या कष्टाने चारा जमा करून साठवून ठेवला होता. मात्र, अचानक लागलेल्या आगीत सुमारे १५ ट्रॅक्टर चारा सारा जळून खाक झाला. वर्षभर जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी केलेले कष्ट क्षणात राखेत बदलल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

घटना घडल्यानंतर वीज मंडळाचे वायरमन घटनास्थळी उपस्थित झाले. मात्र, त्यापूर्वीच शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीची दखल घेतली असती, तर ही दुर्घटना घडली नसती, असा आरोप केला जात आहे.

नुकसानभरपाईची जबाबदारी वीज मंडळाची?

वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा आरोप होत असून, या नुकसानीची भरपाई वीज मंडळाने करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

घटनेच्या दिवशी तलाठी सुट्टीवर असल्याने व बाहेरगावी असल्यामुळे पंचनामा होऊ शकला नाही. तलाठ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता पंचनाम्यासाठी येणार असल्याचे सांगितल्याची माहिती आहे.

आता या घटनेचा अधिकृत पंचनामा, नुकसानभरपाई आणि वीज मंडळाकडून संबंधित प्रकरणात काय कारवाई केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तसेच वीज मंडळाचे शेख साहेब यांच्याकडून या प्रकरणात कोणती भूमिका घेतली जाते, याचीही प्रतीक्षा आहे.

पूर्वसूचना देऊनही दखल न घेतल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल, तर जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाई मिळणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!