समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात! २२ हून अधिक वाहनांचा चुराडा; अनेक प्रवासी जखमी
Nandgaon News
समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात! २२ हून अधिक वाहनांचा चुराडा; अनेक प्रवासी जखमी
दुसरबीडजवळ तळेगाव परिसरात भरधाव ट्रकची वाहनांच्या लांबच लांब रांगेत जोरदार धडक; ७ ते ८ वाहने पूर्णतः चक्काचूर
वेगवान मराठी : मारुती जगधने १३ नोव्हेंबर २०२६
दुसरबीड (जि. बुलढाणा) : समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ तळेगाव परिसरात भीषण साखळी अपघाताची घटना घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना पाठीमागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २२ हून अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७ ते ८ वाहने पूर्णतः चक्काचूर झाली आहेत.
टँकर पलटी झाल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ३२१ व्या किलोमीटरजवळ सकाळी एक टँकर पलटी झाला होता. टँकरमधील पावडर रस्त्यावर पसरल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. टँकर हटविण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी आपापल्या वाहनांमध्ये बसून मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करीत होते.
भरधाव ट्रकची वाहनांच्या रांगेत धडक
दरम्यान, लोखंडी पट्ट्या घेऊन जाणारा ट्रक (एमएच ४० बीएल ४९१४) भरधाव वेगाने येत असताना रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पुढील वाहने एकमेकांवर आदळली आणि भीषण साखळी अपघात घडला. या घटनेत अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
चालकाच्या निष्काळजीपणाचा संशय; पोलिसांकडून तपास सुरू
वाहनांची लांब रांग समोर स्पष्ट दिसत असतानाही ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण का मिळवता आले नाही, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. प्राथमिक स्तरावर ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



