नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

कामायनी एक्स्प्रेसची अनोळखी व्यक्तीला धडक!

Nandgaon News

कामायनी एक्स्प्रेसची अनोळखी व्यक्तीला धडक!

सायंकाळी सहाच्या सुमारास रेल्वे रुळांवर गंभीर दुर्घटना; व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही

वेगवान मराठी : मारुती जगधने

| दि. ९ सप्टेंबर २०२६

नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द परिसरात मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास कामायनी एक्स्प्रेसची एका अनोळखी व्यक्तीला धडक बसल्याची गंभीर घटना घडली. मनमाडहून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेससमोर ही व्यक्ती आल्याने दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती असून, मृताची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नाही.

घटना निदर्शनास आल्यानंतर रेल्वे चालकाने गाडी थांबवली. रेल्वे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे परिसरात काही काळ गर्दी झाली होती.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे हे त्या परिसरातून जात असताना त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित रेल्वे व सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यासाठी पुढाकार घेतला.

घटनेनंतर कामायनी एक्स्प्रेस सुमारे १५ ते २० मिनिटे थांबविण्यात आली. रेल्वे कंट्रोल, RPF तसेच पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर आवश्यक कार्यवाही करण्यात आली आणि त्यानंतर एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

या घटनेची माहिती ट्रॅकमन योगेश मडके, ट्रॅकमन जनार्दन झाल्टे, स्टेशन मास्टर, मनमाड RPF तसेच नांदगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास मनमाड RPF आणि नांदगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

हिसवळ खुर्द व नांदगाव परिसरातील रेल्वेमार्गावर यापूर्वीही रेल्वेतून पडण्याच्या तसेच रेल्वे रुळांवरील अपघाताच्या घटना घडल्याने रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, रेल्वे प्रशासनाने या परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज आहे.

रेल्वे रुळांवरून चालणे किंवा रुळ ओलांडणे अत्यंत धोकादायक आहे. तसेच प्रवाशांनी रेल्वेच्या दरवाज्यात बसणे, उभे राहणे किंवा शरीर बाहेर काढणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे

रेल्वे प्रवासादरम्यान दरवाज्यात बसणे किंवा उभे राहणे जीवघेणे ठरू शकते. रेल्वेमार्गालगतचे खांब, झाडांच्या फांद्या अथवा अन्य अडथळ्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी सुरक्षितपणे प्रवास करावा आणि रेल्वे रुळांवर विनाकारण उतरू नये.

भागवत झाल्टे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी नांदगाव–मनमाड रेल्वेमार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

“परिसरात वारंवार रेल्वे अपघाताच्या घटना घडत आहेत. कधी रेल्वेतून पडण्याच्या घटना घडतात, तर कधी रुळांवर नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागते. रेल्वे प्रशासनाने या परिसरातील सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच नागरिक व प्रवाशांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांचा आणि प्रवाशांचा जीव महत्त्वाचा आहे,” अशी मागणी भागवत झाल्टे यांनी केली.

मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू

या दुर्घटनेतील व्यक्तीची अद्याप अधिकृत ओळख पटलेली नसल्याने तपास यंत्रणांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अधिकृत माहिती प्राप्त होईपर्यंत मृत व्यक्तीचे नाव किंवा अन्य वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. दुर्घटनेचे नेमके कारणही तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

पुढील तपास : मनमाड RPF व नांदगाव ग्रामीण पोलीस ठाणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!