नाशिक ग्रामीण

नाशिक : अज्ञातांकडून एक एकर कारल्याची बाग उध्वस्त; प्रगतशील शेतकऱ्याचे सुमारे १५ लाखांचे नुकसान

Nandgaon news

वेगवान मराठी : मारुती जगधने 18 जुलै 2026

नाशिक :

अज्ञातांकडून एक एकर कारल्याची बाग उध्वस्त; प्रगतशील शेतकऱ्याचे सुमारे १५ लाखांचे नुकसान
येवला (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव येथील प्रगतशील शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून कारल्याच्या शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले होते. संरक्षित शेती (शेडनेट/मांडव पद्धत) अंतर्गत घेतलेल्या कारल्याच्या पिकातून त्यांनी सुमारे १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची किमया साधली होती. दर्जेदार बियाण्यांचा वापर, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि वेळेवर पीक संरक्षण यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली होती. कमी क्षेत्रातूनही नियोजनबद्ध शेतीच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले होते.
मात्र, या यशाला अज्ञात विकृत व्यक्तीच्या कृत्याने मोठा धक्का बसला आहे. रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या एक एकर कारल्याच्या बागेतील वेल मुळासकट उपटून टाकल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
संजय वाळके हे अल्पभूधारक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करणारे शेतकरी आहेत. यंदा वेळेवर पाऊस न झाल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी पीक कर्ज काढून मोठ्या मेहनतीने कारल्याची बाग उभी केली होती. बागेला फळधारणा सुरू झाल्यानंतरच अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच शासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!