नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; खड्डे, रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे आणि निकृष्ट दुरुस्तीमुळे अपघातांचा धोका वाढला

Nandgaon news

राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; खड्डे, रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे आणि निकृष्ट दुरुस्तीमुळे अपघातांचा धोका वाढला

वेगवान मराठी: मारुती जगधने दिनांक 9 जुलै 2026

नांदगाव, दि. ९ जुलै : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753J वरील नांदगाव परिसरातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहनधारक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे, रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे आणि निकृष्ट दर्जाची तात्पुरती दुरुस्ती यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या बाभळीसह इतर काटेरी झुडपांनी रस्त्याचा कडील भाग पूर्णपणे व्यापला आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या थेट डांबरी रस्त्यावर आल्याने वाहनांना मार्ग काढणे अवघड होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना काटेरी फांद्यांपासून बचाव करण्यासाठी वाहन अचानक मध्यभागी घ्यावे लागत असल्याने समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनांशी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात हा धोका आणखी गंभीर स्वरूप धारण करतो. वळणाच्या ठिकाणी झुडपांमुळे दृश्यमानता कमी होत असून, आपत्कालीन परिस्थितीत वाहन बाजूला घेण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध राहत नाही.
दरम्यान, महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या आरोपानुसार, अनेक ठिकाणी डांबराऐवजी माती, मुरूम आणि बारीक खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही तात्पुरती मलमपट्टी पहिल्याच पावसात वाहून जाण्याची शक्यता असून, त्यामुळे रस्ता अधिक निसरडा बनून अपघातांचा धोका वाढत आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो मालवाहू ट्रक, बस, खासगी वाहने आणि दुचाकींची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. खराब रस्त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, प्रवाशांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महामार्गाची नियमित झाडछाटणी, रस्त्याच्या कडील झुडपे हटविणे, दर्जेदार डांबरीकरण करणे आणि धोकादायक ठिकाणी सूचना फलक व रिफ्लेक्टर बसविणे ही कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांचा सवाल :
“वाहनधारकांकडून टोल वसूल केला जातो, मात्र त्याबदल्यात सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता का मिळत नाही? खड्डे मातीने बुजवून वेळ मारून नेण्याऐवजी कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
नांदगाव परिसरातील NH-753J वरील ही परिस्थिती भविष्यात कोणत्याही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून काटेरी झुडपे हटविणे, कायमस्वरूपी डांबरीकरण करणे आणि रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिवाय या नॅशनल हायवे वरील अनेक Patha Deep देखील बंद आहे . नांदगाव पंचक्रोशीतील शहरालगत असलेले पददीप सातत्याने बंद असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!