नाशिक ग्रामीण

चोरचावडी धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी; देवळा तहसिलदारांचे आदेश, ‘BNSS’ कलम १६३ लागू

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे रामनगर चोरचावडी येथील धबधबा प्रवाहित झाला असून पाण्याचा प्रवाह देखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन आणि कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी देवळा तालुक्याचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी धबधबा व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, हा परिसर पर्यटकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे.

रामनगर चोरचावडी येथील धबधब्याच्या परिसरात नुकताच पाण्यात बुडून एका युवकाचा जीव   गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली असून या ठिकाणी यापूर्वी देखील अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. पावसामुळे धबधबा परिसरातील खडक अत्यंत निसरडे झाले आहेत, तसेच खोल पाण्याचा अंदाज येत नसल्याने मानवी जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने, भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हे निर्बंध लागू केले आहेत.

प्रशासनाने जारी केलेले मुख्य प्रतिबंधात्मक आदेश:
पाण्यात उतरण्यास पूर्ण बंदी:
धबधब्याच्या मुख्य प्रवाहात उतरणे, पोहणे आणि धबधब्याच्या खाली जाण्यास पर्यटकांना सक्त मनाई करण्यात आली आहे.
धोकादायक क्षेत्रात प्रवेश बंदी:
धबधब्याचे कडे, निसरड्या कडा आणि तीव्र उताराच्या भागात जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
सेल्फी आणि रिल्स बनवण्यावर बंदी:
धबधबा परिसरात कोणत्याही प्रकारचे धोकादायक स्टंट करणे, सेल्फी काढणे, सोशल मीडियासाठी रिल्स किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल.
मद्यपान व हुल्लडबाजीस मनाई:
परिसरात मद्यपान करणे, मद्य बाळगणे, त्याची वाहतूक करणे आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
वाहन पार्किंगचे नियम: 
स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या पार्किंग क्षेत्राव्यतिरिक्त धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आणि परिसरात खाजगी वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वरील आदेश चांदवड उपविभागीय अधिकारी यांच्या मान्यतेने तात्काळ लागू करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पोलीस बंदोबस्त आणि अंमलबजावणी
या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी देवळा पोलीस स्टेशनला धबधबा परिसरात योग्य तो बंदोबस्त तैनात करण्याचे आणि बॅरिकेडिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक ग्रामपंचायतीला धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक फलक (बॅनर्स) लावून नागरिकांना जागरूक करण्याचे निर्देश  देवळा तहसीलदार यांनी दिले आहेत.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!