नांदगाव-मनमाड रोडवर ट्रॅक्टरची धडक; युवकाचा मृत्यू, एक गंभीर
Nandgaon news
नांदगाव-मनमाड रोडवर ट्रॅक्टरची धडक; युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
नांदगाव, दि. 17 जुलै (वेगवान मराठी :मारुती जगधने ): नांदगाव-मनमाड रोडवरील गुरुकुल कॉलेजजवळ 15 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात एका 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामनगर येथील दिलीप काशिनाथ मोरे (वय 20) हे पायी जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात फुलेनगर येथील अशोक सुखदेव कोळेकर हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना नॅशनल हायवे क्रमांक 753 वरील गुरुकुल कॉलेज परिसरात घडली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे, रस्त्यावरील खड्डे आणि अपुरा प्रकाश यामुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.
याशिवाय, अनेक ट्रॅक्टर चालकांकडे वैध वाहन परवाना नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच काही वाहनचालक बेदरकारपणे व अतिवेगाने वाहने चालवतात. अल्पवयीन मुलेही चारचाकी वाहने चालवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक झुडपे तातडीने हटवावीत, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि वाहतूक नियमांचे कठोर पालन करून घ्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच रस्त्याची देखभाल वेळेवर न झाल्यास संबंधित यंत्रणा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदारीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.



