नाशिक ग्रामीण

अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा मंजूर होऊ दिला जाणार नाही : आ. डॉ. राहुल आहेर यांची ग्वाही

 

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : देवळा शहरवासीयांवर अन्यायकारक असलेला प्रारूप विकास आराखडा कुठल्याही परिस्थितीत मंजूर होऊ दिला जाणार नाही. तसेच नवीन प्रारूप आराखडा तयार करताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल अशी ग्वाही आ. डॉ राहुल आहेर यांनी दिली. यावेळी नगररचना विभागाचे सह संचालक रितेश चव्हाण, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, अपूर्वा डोळे, नगराध्यक्ष भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष संजय आहेर उपस्थित होते.

सहसंचालक, नगररचना विभाग, नाशिक यांनी तयार केलेला देवळा नगरपंचायत हद्दीतील विद्यमान जमीन वापर नकाशा. देवळा वासियांवर अन्याय करणारा असून हा प्रारूप विकास आराखडा त्वरित रद्द करावा. यासाठी शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेकडो शेतकऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते यावेळी आ. आहेर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

देवळा नगरपंचायत हद्दीतील प्रारूप विकास योजनेंतर्गत सह संचालक नगररचना विभाग नाशिक यांचे मार्फत विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यात आला असून, तो नगरपंचायतीत दि. २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला. व त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना संदर्भात तीस दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानुसार नगरपंचायतीकडे शेकडो बाधित नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. यानुसार नगररचना विभागाने देवळा नगरपंचायत हद्दीतून अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकून अन्याय झाल्याचे नागरिकांच्या सूचनेनुसार दिसून आले, यात अनेक शेतामधून १२ ते ३० मीटर पर्यंत चे रिंग रोड दाखविण्यात आले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या जागेवर शैक्षणिक आरक्षण, वाणिज्य आरक्षण, मोकळे भूखंड अशा प्रकारचे आरक्षण लादण्यात आले. सदरचा आराखडा मंजूर करत असताना शासनाकडून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदरचा आराखडा तयार करण्यात आल्याने प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद हरकतीद्वारे मांडण्यात आले.

 त्याच प्रमाणे देवळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग नुकताच झाला असल्याने त्याठिकाणी महामार्गालगतच्या गावठाण हद्दीतील इमारतींना सीमांकान केल्याने व्यापारी बांधवांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, समोर शासकीय जागा उपलब्ध असतांना देखील गावठाण हद्दीतील पक्क्या इमारतींना सीमांकन कसे केले आहे? याबाबत देवळा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांचे आक्षेप असून सदर आराखडा तत्काळ रद्द करण्यासाठी शुक्रवार दिनांक २७ रोजी सकाळी १० वा. पासून देवळा नगरपंचायतीसमोर भाजप तालुकाध्यक्ष किशोर आहेर, शहराध्यक्ष अशोक आहेर, सुनिल आहेर, अंकुश देवरे, उमेश आहेर, राजेंद्र आहेर, पुंडलिक आहेर, वसंत आढाव आदींसह शेकडो बाधित शेतकरी उपोषणासाठी बसले होते.

 

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!