शेती

डिझेलअभावी मशागतीची कामे ठप्प; देवळ्यात शेतकऱ्यांचे ‘ड्रम बजाव’ आंदोलन

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपांवर ड्रम आणि कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. १५) देवळा तहसील कार्यालयावर धडक देत अनोखे ‘ड्रम बजाव’ आंदोलन केले. रिकामे ड्रम वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

केंद्र शासनाने ११ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील नव्या निर्देशांमुळे पेट्रोल पंपांवर ड्रम व कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आल्याचे पंप चालकांकडून सांगितले जात आहे. या निर्णयाचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला असून कृषी यंत्रसामग्रीसाठी डिझेल मिळणे कठीण झाले आहे. सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असल्याने डिझेलअभावी शेतीची कामे खोळंबली आहेत.

खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रिकामे ड्रम घेऊन थेट नायब तहसीलदार कैलास निकम यांच्या कार्यालयात प्रवेश केला व त्यांच्या टेबलावर ड्रम ठेवून घोषणाबाजी केली. यानंतर नायब तहसीलदार कैलास निकम व पुरवठा अधिकारी शारदा गावंडे यांना निवेदन देण्यात आले. ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पूर्वीप्रमाणे ड्रम व कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या आंदोलनात गणेश शेवाळे, सोपान सोनवणे, सतीश शेवाळे, सदाशिव शेवाळे, विनोद मोरे, योगेश मोरे, सौरभ शेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!