गिरणा धरणावरील पंपिंग स्टेशनच्या बिघाडामुळे छप्पन खेडी योजनेचा पाणीपुरवठा ठप्प
Nandgaon news

गिरणा धरणावरील पंपिंग स्टेशनच्या बिघाडामुळे छप्पन खेडी योजनेचा पाणीपुरवठा ठप्प
वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक 17 जून 2026
नांदगाव/मालेगाव प्रतिनिधी : नांदगाव व मालेगाव तालुक्यातील छप्पन खेडी एमजीपी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) योजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणावरील पांझण येथील पंपिंग स्टेशनमधील विद्युत मोटरमध्ये गंभीर बिघाड झाल्याने या योजनेचा पाणीपुरवठा पुढील १० ते १२ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात छप्पन खेडी योजनेअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांझण येथील पंपिंग स्टेशनवरून गिरणा धरणातील पाणी उपसा करून नांदगाव व मालेगाव तालुक्यातील ५६ गावांना पुरवठा केला जातो. मात्र, पाणी उपसा करणाऱ्या मुख्य इलेक्ट्रिक मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण योजनेचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. संबंधित मोटर दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली असून, दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी किमान १० ते १२ दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी अनेक गावांना १२ ते १५ दिवस नियमित पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
दरम्यान, छप्पन खेडी एमजीपी योजना अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आली असून ती आता मुदतबाह्य अवस्थेत पोहोचली आहे. योजनेतील यंत्रसामग्री, पाइपलाइन आणि इतर तांत्रिक सुविधा जीर्ण झाल्याने वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. योजना अखेरच्या घटका मोजत असतानाही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रशासनाला अद्याप याच योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे.
या बिघाडामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच छप्पन खेडी योजनेच्या पुनर्बांधणीसह दीर्घकालीन शाश्वत जलपुरवठा व्यवस्था उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे छप्पन खेडी एमजीपी योजनेच्या कारभाराचा बोजवारा उडाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.


