चलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : ७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्य लिपिकाला रंगेहाथ अटक
Nandgaon news
चलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : ७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्य लिपिकाला रंगेहाथ अटक
वेगवान
मराठी: मारुती जगधने
नाशिक, दि. १९ जून २०२६ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) नाशिकने येवला येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिकाला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, स. आरोपी सुधीर गोविंद वाघ (वय ४५ वर्षे) हे सहायक निबंधक, सहकारी संस्था, येवला कार्यालयात मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या सावकारी परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आरोपीने यापूर्वी ६० हजार रुपये स्वीकारले होते. त्यानंतर पुन्हा परवाना मंजुरीसाठी ७ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तडजोडीनंतर ५ हजार रुपये स्वीकारण्याचे स. आरोपीने मान्य केले. त्यानुसार येवला येथील प्रशासकीय कार्यालय परिसरात सापळा लावण्यात आला. स. आरोपीने तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACB पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागरिकांना आवाहन : कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.


