नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

रस्ता रोको आंदोलन’ करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nandgaon news

साकोरे (ता. नांदगाव) : साकोरे ते सायगाव (एरंडोल) महामार्गालगत नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्पीड ब्रेकर उभारावेत, तसेच गावालगतच्या जोडरस्त्यांची दुरुस्ती करावी आणि साकोरे-नांदगाव मार्गावरील धोकादायक झाडे हटवून त्या ठिकाणी नवीन वृक्षारोपण करावे, अशी मागणी साकोरे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

क. भा. पा. विद्यालय साकोरे, पेडकाई विद्यालय साकोरे आणि जिल्हा परिषद शाळा साकोरे या शैक्षणिक संस्थांसमोर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायतीने यापूर्वीही अनेक वेळा एमएसआरडीसी आणि संबंधित ठेकेदार कंपनीकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. मात्र, संबंधित कंपनीकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासक तथा माजी सरपंच अतुलभाऊ बोरसे पाटील यांनी तातडीची बैठक घेऊन नांदगावचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मागण्यांवर त्वरित सकारात्मक कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी उपसरपंच रामकृष्ण बोरसे, घनश्याम सुरसे, गोरख बोरसे, रवींद्र बोरसे, सोमनाथ उडकुडे, संदीप बोरसे, योगेश भाऊराव बोरसे, एकनाथ मोरे यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास आणि आवश्यक कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने २५ जून २०२६ रोजी लोकशाही मार्गाने ‘रस्ता रोको आंदोलन’ करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!