नाशिक ग्रामीणनाशिक शहरमहाराष्ट्र,देश

कुंभकलशावर 52 योगासने व 11 सूर्यनमस्कार; योगगुरू बाळासाहेब मोकळ यांचा विश्वविक्रम

Nandgaon news

कुंभकलशावर 52 योगासने व 11 सूर्यनमस्कार; प्रा.
योगगुरू बाळासाहेब मोकळ यांचा विश्वविक्रम

वेगवान मराठी ; मारुती जगधने दि 13 जुन 2026

नाशिक : “योगाचा प्रचार घराघरात व कुंभाचा प्रचार विश्वभरात” या संकल्पनेतून प्रेरित होऊन योगगुरू बाळासाहेब मोकळ यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर कुंभकलशावर योगासनांचे अनोखे प्रात्यक्षिक सादर करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

अवघ्या 30 मिनिटांत 52 योगासने आणि 11 सूर्यनमस्कार पूर्ण करून त्यांनी हा विक्रम आपल्या नावावर नोंदविला. विशेष म्हणजे हा संपूर्ण योगप्रयोग केवळ 4 फूट उंच व 2 फूट रुंद जागेवर करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची अधिकृत नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या संस्थापक व मुख्य संपादक सुषमा नार्वेकर यांनी घेतली असून त्यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या विक्रमादरम्यान बाळासाहेब मोकळ यांनी भुजंगासन, प्रगत शलभासन, धनुरासन, हलासन, सर्वांगासन, सेतूबंधासन, त्रिकोणासन, पवनमुक्तासन, निर्गुण्डासन, उग्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, वीरासन, प्रगत वृक्षासन आणि बद्ध पद्मबंधासन यांसह अनेक कठीण व उच्च दर्जाच्या योगासनांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. शारीरिक संतुलन, मानसिक एकाग्रता आणि सातत्यपूर्ण योगसाधनेचा उत्कृष्ट संगम या विक्रमातून दिसून आला.

गेली 23 वर्षे योगाचा प्रचार व प्रसार करणारे बाळासाहेब मोकळ यांनी हजारो नागरिकांना योगमार्गाशी जोडण्याचे कार्य केले आहे. यापूर्वीही मोटारसायकलवर, कडुनिंबाच्या झाडावर तसेच बर्फावर योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून त्यांनी अनेक विश्वविक्रमांची नोंद केली आहे. त्यांच्या नव्या कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या कार्यक्रमास नगरसेविका सीमाताई ताजणे, माजी पोलीस निरीक्षक रमेश भवर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, योगदर्शन योग केंद्राचे योगशिक्षक, योगसाधक, क्रियायोग साधक आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब मोकळ यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आगामी नाशिक कुंभमेळ्याचा संदेश जगभर पोहोचविणारा हा उपक्रम विशेष आकर्षणाचा विषय ठरला असून भारतीय योग परंपरा, अध्यात्म आणि कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य जागतिक स्तरावर पोहोचविण्यास तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!