अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ — सरकारने घ्यावी तातडीने दखल”
Nandgaon News
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ — सरकारने घ्यावी तातडीने दखल”
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव ” , दि. १० ऑक्टोबर २०२५ ॥
अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथेला शब्दरूप देत एका कवीने आपल्या कवितेत “ज्याचा जीवावर जगते ही सृष्टी, त्याच्याच जीवाशी खेळतेय अतिवृष्टी” असे म्हटले आहे. या ओळींमधून शेतकऱ्याच्या दुःखाचा हळवा स्वर उमटतो.
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान केले असून अनेक ठिकाणी पिके आडवी झाली, शेतकरी हवालदिल झाला आहे. तरीदेखील अद्याप शासनाकडून मदतीबाबत ठोस निर्णय झाला नाही.
स्थानिक शेतकरी संघटनांनी सरकारकडे “सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून मदत जाहीर करण्याची मागणी” केली आहे.
— “मायबाप सरकार टाका मदतीसाठी दृष्टी, सरसकट ओल्या दुष्काळाची करावी आता पुष्टी” — या सध्याच्या परिस्थितीतील जनभावनांचे अचूक प्रतिबिंब मानले जात आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, परतीचा पाऊस परत काही जात नाही, आणि चांगले दिवसही शेतकऱ्यांच्या वाट्याला येत नाहीत.
शासनाने या आर्त हाकेला प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता तीव्र होत आहे.
“ज्याचा जीवावर जगते ही सृष्टी…”
हा शेतकरी…
जो सकाळी पेरतो आशेची बीजं, आणि संध्याकाळी मोजतो ढगांच्या छायेतल्या स्वप्नांची गणना.
पण आता त्याच्याच जीवाशी खेळतेय अतिवृष्टी…!ओल्या मातीचा सुगंध आता दु:खाचा वास देतो आहे.
भिजलेली शेते आता पोटभर अन्न नव्हे, तर ओल्या डोळ्यांचे प्रतिक बनली आहेत.—
“मायबाप सरकार, टाका मदतीसाठी दृष्टी.
सरसकट ओल्या दुष्काळाची, करावी आता पुष्टी.”ही फक्त कविता नाही… ही एक आर्त विनंती आहे.
“शेतकऱ्यांच्या नशिबी, चांगले दिवस काही येईना…”
पण आम्हाला खात्री आहे —
जर शासनाने आणि समाजाने डोळे उघडले,
तर हा शेतकरी पुन्हा उभा राहील,
पुन्हा हिरवळ फुलेल,
आणि सृष्टी पुन्हा नव्या जीवनाने न्हाऊन निघेल.



