जागतिक योग दिनानिमित्त योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल योगाचार्य बाळासाहेब मोकळ यांना ‘योगदूत’ पुरस्काराने गौरव
Nandgaon News

जागतिक योग दिनानिमित्त योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल योगाचार्य बाळासाहेब मोकळ यांना ‘योगदूत’ पुरस्काराने गौरव
वेगवान मराठी ; मारुती जगधने दि
नाशिकरोड : जैन स्थानकवासी श्रावक संघ नाशिकरोड व राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्टार ज्येष्ठ नागरिक संघटना (स्टार हास्य योग क्लब) यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात योगदर्शन योग केंद्राचे संचालक, आयुष मंत्रालय प्रमाणित योग शिक्षक तथा चार वेळा विश्वविक्रम प्रस्थापित करणारे योगाचार्य बाळासाहेब मोकळ यांना योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘योगदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या २३ वर्षांपासून बाळासाहेब मोकळ हे योगदर्शन योग केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांना योगाचे प्रशिक्षण देत आहेत. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनशैलीचा मार्ग आहे, हा संदेश ते सातत्याने समाजात पोहोचवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो साधकांनी योगाचा लाभ घेतला असून अनेकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल घडून आले आहेत.
विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुंभकलशावर योगासने सादर करून त्यांनी नवीन विश्वविक्रमाची नोंद केली आहे. “योगाचा प्रचार घराघरात व कुंभाचा प्रचार विश्वभरात” या संकल्पनेतून ते कार्यरत असून योगाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवत आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किरणमलजी धाडीवाल, गिरिराजजी शहा, माजी नगरसेवक त्रंबकराव गायकवाड तसेच स्टार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भंडारी, उपाध्यक्ष केशव वाणी, सचिव प्रकाश सावंत आणि खजिनदार नारायण हर्णे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब मोकळ यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना बाळासाहेब मोकळ यांनी हा सन्मान आपल्या आई-वडिलांना, गुरूजनांना, कुटुंबीयांना, योगदर्शन योग केंद्रातील सर्व साधकांना आणि शुभेच्छुकांना समर्पित केला. भविष्यातही अधिक जोमाने योगाचा प्रसार करून निरोगी समाज घडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या सन्मानाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि योग क्षेत्रातील मान्यवरांनी बाळासाहेब मोकळ यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मोठ्या संख्येने योगप्रेमी, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



