नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नांदगाव शहरासह पंचक्रोशीत मुसळधार पावसाचे आगमन

Nandgaon News

नांदगाव शहरासह पंचक्रोशीत मुसळधार पावसाचे आगमन

वेगवान मराठी : मारुती जगधने दिनांक 22 जून 2026

नांदगाव शहर आणि परिसरातील पंचक्रोशीत सोमवारी सायंकाळी मेघगर्जना, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
सुमारे एक तास कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते, गल्लीबोळ आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने परिसर जलमय झाला.
पावसासोबतच मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा जोर असल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, शेतीच्या दृष्टीने हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावर्षीच्या पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या असून आगामी काही दिवसांतही चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या जोरदार पावसाच्या धारांनी नांदगाव शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!