ओझर विमानतळ नामकरण मुद्दा : खा, राजाभाऊ वाजे यांचा केंद्राकडे आग्रह,,,!
कुंभमेळा लक्षात घेऊन सरकारने याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
*तब्बल १० विषयांवर खासदार वाजे यांची नागरी उड्डाणमंत्री नायडू यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक*
*विमानतळ विस्तार ते नामांतर, खासदार वाजे आणि मंत्री नायडू यांच्या बैठकीत १० विषयांवर चर्चा*
*यशवंतराव चव्हाण यांचे ओझर विमानतळाला नाव द्या, खासदार वाजे यांची केंद्राकडे मागणी*
*एच.ए.एल.चे एम.आर.ओ. वापरण्यासाठी हवाई कंपन्यांना प्रोत्साहित करण्याची वाजे यांची मागणी, एच.ए. एल.चे महत्व वाढण्यास होईल मदत*
सिन्नर : दि, 7 ऑगस्ट 2025 – —
नाशिक/ नवी दिल्ली : खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. किंजरापू राममोहन नायडू यांची दिल्लीत सोमवारी (दि.४ऑगस्ट) सविस्तर भेट घेऊन नाशिकच्या ओझर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासह हवाई संपर्क विस्ताराच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रदीर्घ बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
या बैठकीत नाशिक-दिल्ली दररोजची थांबवलेली फ्लाइट सेवा पुन्हा सुरू करणे, ओझर विमानतळाचा टर्मिनल विस्तार, नव्या धावपट्टीचे काम, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हेलिपॅड्सची गरज, आणि नव्या हवाई मार्गांची मागणी अशा विविध बाबी मंत्र्यांसमोर ठामपणे मांडण्यात आल्या. सध्या आठवड्यात फक्त तीनच दिवस सुरु असलेल्या दिल्ली-नाशिक फ्लाइटमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सेवा पूर्वीप्रमाणे दररोज सुरू झाल्यास, नाशिकच्या व्यापारी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि धार्मिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे वाजे यांनी स्पष्ट केले.
ओझर विमानतळावर एकाचवेळी १००० प्रवाशांची क्षमता असणारा नविन टर्मिनल उभारणे, टॅक्सी वे व नविन विमानतळ अप्रोच विकसित करणे, तसेच अधिक विमानतळ पार्किंग स्पेसची निर्मिती करणे या सगळ्या प्रस्तावांना केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासोबतच, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर आणि ओझर येथे स्वतंत्र हेलिपॅड्सची उभारणी केली जावी, अशी विनंतीही त्यांनी केली. कुंभमेळ्याच्या वेळी अतिविशाल भाविक संख्येचा विचार करता, ही यंत्रणा आपत्कालीन व प्रशासकीय कारणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
खासदार वाजे यांनी ओझर विमानतळाचे नामकरण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर करण्याची मागणी केली. त्यांनी नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ची स्थापना करून या भागाला औद्योगिक, संरक्षण आणि हवाई दृष्टीने सक्षम केले, याची आठवण त्यांनी मंत्री महोदयांना करून दिली.
नाशिकहून कोलकाता, चेन्नई, नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि वाराणसीसारख्या महत्त्वाच्या शहरांशी हवाई संपर्क स्थापन करण्याची गरजही त्यांनी मांडली. यामुळे पर्यटन, व्यापार, शिक्षण व वैद्यकीय सेवांमध्ये नाशिकचा सहभाग वाढेल. तसेच, दिल्ली-नाशिक सायंकाळी थेट फ्लाइट सुरु होण्यासाठी दिल्ली विमानतळावर रात्रीच्या स्लॉट मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची मागणीही त्यांनी केली.
HAL नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या नवीन Airbus A320 MRO युनिटसाठी देशांतर्गत कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक पावले उचलावीत, अशी विनंती करताना, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना मिळेल, असे ते म्हणाले. यासोबतच, HAL कडून उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या इमिग्रेशन सुविधांचे लवकरात लवकर संचालन सुरू करावे, ही मागणीही त्यांनी केली.
या बैठकीत मंत्री श्री. राममोहन नायडू यांनी अनेक मुद्द्यांवर सकारात्मकता दर्शवून प्रस्तावांचा सखोल विचार करण्याचे आश्वासन दिले. केंद्र आणि राज्य सरकार तसेच HAL व इतर संबधित संस्थांमध्ये समन्वय साधून प्रस्तावित प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यावर दोघांनी एकमत दर्शवले.
खासदार वाजे यांच्या या पुढाकारामुळे नाशिकच्या हवाई विकासाला निश्चितच नवे गतीशील वळण मिळेल. कुंभमेळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा सशक्त होतील, तर दीर्घकालीन दृष्टीने नाशिकचा आर्थिक, धार्मिक आणि औद्योगिक चेहरा अधिक उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*कोट*
“हवाई वाहतूक सेवा ज्याठिकाणी चांगली असते त्या भागाच्या विकासाला महत्वपूर्ण इंजिन जोडले जाऊन विकासाची गती अधिक वाढते. त्यामुळे ओझर विमानतळ अधिकाधिक समृद्ध कसे होईल याकडे माझं लक्ष आहे. मंत्री नायडू जी यांना ओझर विमानतळाबाबतच्या अनेक प्रश्नबाबत सज्ञान करून त्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे. तब्बल १० विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली आहे. भविष्यात मुंबईला पर्याय म्हणून ओझर विमानतळ समृद्धीस यावे असा माझा मानस आहे : *राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक लोकसभा*
*या विषयांवर झाली प्रदीर्घ चर्चा*
खासदार वाजे यांनी मंत्री नायडू यांच्याकडे ओझर (नाशिक) विमानतळाच्या विकासासाठी पुढील प्रस्ताव मांडले:
1. *नाशिक-दिल्ली दररोजच्या फ्लाइटची पुनर्स्थापना* — सध्या आठवड्यातून फक्त तीन दिवस चालणारी इंडिगोची फ्लाइट पूर्वीप्रमाणे दररोज सुरु करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. ही सेवा व्यापारी, वैद्यकीय, विद्यार्थी व भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
2. *ओझर विमानतळावर धावपट्टीचे विस्तारीकरण, टर्मिनल वाढ व हेलिपॅड्सची स्थापना* — २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, विमानतळाची क्षमता वाढवणे आवश्यक आहे.
3. *हवाई उड्डाणांसाठी नव्या मार्गांची गरज* — नाशिकहून कोलकाता, चेन्नई, पुणे, नागपूर, वाराणसी, कोल्हापूर आदी शहरांसाठी नियमित उड्डाणे सुरु करण्याची मागणी.
4. *ओझर विमानतळाचे नामकरण ‘यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक’ असे करण्याची विनंती*- दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाशिकचे खासदार म्हणून जे काही नाशिकचा ऐतिहासिक योगदान आहे त्याचे स्मरण म्हणून हे नाव देण्याची मागणी करण्यात आली.
5. *नाशिक विमानतळाला ‘मेजर एअरपोर्ट’चा दर्जा देणे*- हा दर्जा प्राप्त झाल्यास त्यातून केंद्र सरकारकडून अधिकचा निधी व सुविधा प्राप्त होण्यास मदत होईल.
6. *हवाई कंपन्यांना HAL नाशिक MRO (A320 Aircraft साठी) सुविधा वापरण्यास प्रोत्साहन देणे*- जेणेकरून देशांतर्गत देखभाल खर्चात बचत होईलच शिवाय HAL चे महत्व अधिक वाढून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होण्यास मदत होईल.
7. *नाशिक विमानतळावर स्थानिक उत्पादने विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्था* — ‘वोकल फॉर लोकल’ उपक्रमाला चालना देण्यासाठी ही मागणी करण्यात आली.
8. *आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन सुविधा सुरु करणे* — यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा HAL कडून पूर्ण करण्यात आल्या असून, केवळ कार्यान्वयन टप्प्यात प्रक्रिया आहे.
9. *दिल्ली-नाशिक सायंकाळी फ्लाइट सुरु करण्यासाठी स्लॉट मंजुरीसाठी पाठपुरावा* — सध्याच्या सकाळच्या एकमेव फ्लाइटमुळे परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत.
10. *कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हेलिपॅड सुविधा विकसित करणे* — त्र्यंबकेश्वर परिसरात व्हीआयपी आणि आपत्कालीन सेवा सुरळीत होण्यासाठी ही अत्यावश्यक सुविधा आहे.



