भऊर येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा उत्साहात; ३० शाळांनी घेतला सहभाग

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुण शोधण्यासाठी देवळा पंचायत समिती आणि श्री सिद्धेश्वर विद्यालय, भऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६’ मोठ्या उत्साहात भऊर येथे पार पडला. तालुक्यातील तब्बल ३० शाळांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या वैज्ञानिक कौशल्याची चुणूक दाखवली.
कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, केंद्रप्रमुख बी. सी. गांगुर्डे व मुख्याध्यापक एस. के. पगार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात के. आर. आहेर यांनी विज्ञान मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, संशोधन प्रकल्प व अभिनव संकल्पना उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. परीक्षक म्हणून लाभलेले शिक्षक निकम व कोर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले.
तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र कापडणीस यांनी मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन केले, तर ए. एस. अहिरराव यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी शाळा अशा सर्वच घटकांमुळे हे प्रदर्शन यशस्वी झाले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची नवी उमेद निर्माण झाली आहे.



