
गुलझार वाडा परिसरातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; नागरिक त्रस्त
वेगवान मराठी : दि : 4 Augusta2026
नांदगाव | प्रतिनिधी
नांदगाव शहरातील गुलझार वाडा परिसरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल, खड्डे आणि पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून पादचाऱ्यांनाही चिखलातून वाट काढावी लागत आहे.
या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असल्याचे सांगितले. मात्र अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नागरिकांनी नगरपरिषदेने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी साचणार नाही, अशी जलनिस्सारण व्यवस्था उभारावी, अशी मागणी केली आहे.



