कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट,रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि १२सप्टेंबर २०२५:- बागलाण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दिवसागणिक अधिकच बिकट होत चालली असून, या वर्षी कांद्याचे दर अधिक घसरल्याने शेतकऱ्यांचा झालेला उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार (दि.१२)रोजी सकाळी नामपूर बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर रयत क्रांती संघटना व महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य मित्र पक्षांनी सहभाग घेतला होता. आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काहि काळ वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरतच आहेत. सध्या बाजारपेठेत कांद्याला सरासरी दर ७०० ते ८०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. हे दर उत्पादन खर्चाच्या पेक्षा देखील खूपच खाली असल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे.

यावेळी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना भावांतर योजना लागू करून प्रतिक्विंटल १२००रु अनुदान देण्यात यावे, नाफेड मार्फत खरेदी झालेला कांदा पुन्हा बाजार समितीत विक्रीस येऊ नये, केंद्र व राज्य शासनाने प्रतिक्विंटल ५०० रु अनुदान जाहीर करावे, यंदा नाफेडने परवाना दिलेल्या बोगस खरेदी सोसायट्यांची सखोल चौकशी करावी, शेतकऱ्यांना लाभ होईल अशा पद्धतीने खरेदी केंद्र स्थानिक पातळीवरच सुरू करावे अशा मागण्या करण्यात आल्या.
नामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाने या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलकांनी ‘लोकशाही संपली असून आता ठोकशाही सुरू करावी लागेल’ असा तीव्र इशारा दिला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी शासन कर्त्यांना जागा दाखवू असा इशाराही नेत्यांनी दिला.
या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपक पगार, जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे, सुभाष शिंदे, मयूर नेरकर, बाळासाहेब चौधरी, विनोद अहिरे, विलास सावंत, गणेश भामरे, खेमराज कोर, राजीव सावंत, पवीण सावंत सचिन मथा विज अहिरे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनाला खासदार डॉ. शोभा बच्छाव, भास्कर भगरे, माजी आमदार संजय चव्हाण, पवन ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. नामपूर सोसायटीला कांदा खरेदीचा परवाना देण्यात आला असला तरी खरेदी केंद्र उमराणे येथे सुरू करण्यात आले आहे, ज्याचा नामपूर व परिसरातील शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याची तीव्र नाराजी जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे, सुभाष शिंदे, विठ्ठल महाजन यांनी व्यक्त केली. “ही सोसायटी नामपूरकरांची की उमराणेकरांची?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.



