नाशिक ग्रामीणशेती

खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांचा बागलाण दौरा; नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांनी वाचला अडचणींचा पाढा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांचा बागलाण दौरा; पंचनाम्यांच्या अडचणींवर दिलासा

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.९आक्टोबर २०२५ :-

बागलाण तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, भुईमूग, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी अंबासन, खामलोण, खालचे टेंभे, श्रीपुरवडे, टिंगरी, भीमाशंकर, बिलपुरी, बोढरी, चिराई, महड, वरचे टेभे, तळवाडे आदी गावांमधील नुकसानग्रस्त भागाचा धावता दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला.

खासदार बच्छाव यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. अनेक ठिकाणी मका पिकांमध्ये कोंब फुटले असून कांद्याची रोपे पाण्यात कुजून गेली आहेत. खामलोण गावात वाऱ्याने उध्वस्त झालेली घरे, पोल्ट्री शेड्स आणि कांदा चाळींचीही पाहणी त्यांनी केली. अंगावर भिंत पडून मृत्युमुखी पडलेल्या कै. कस्तुराबाई अहिरे यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन सांत्वनही केले. या दौऱ्यात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपले अडथळे आणि अडचणी खासदार बच्छाव यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी केल्या. काही गावांमध्ये खात्याचे KYC नाही, आधार कार्ड व बँक पासबुक अपडेट नाहीत, सातबाऱ्यावर पिक पाहणी नोंदलेली नाही, सामूहिक खाती आहेत, अशा विविध अडचणींचा पाढा वाचण्यात आला. मात्र यावर खासदार बच्छाव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पंचनामे करण्यासाठी असे कोणतेही अटीनियम नसून, अशा कारणांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. दौऱ्यादरम्यान अनेक गावांमध्ये शेतकरी, विशेषतः महिला, आपल्या हालअपेष्टांची कहाणी सांगताना अश्रू अनावर झाले. शेतीची ही दुर्दशा पाहून अनेक ठिकाणी वातावरण भावनिक झाले.

नामपूर ग्रामपंचायत कार्यालय आणि भीमाशंकर मंदिर येथे झालेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधत शेतकऱ्यांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी खासदार बच्छाव यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, कोणत्याही शेतकऱ्याला केवळ कागदपत्रांच्या कारणावरून नुकसान भरपाईपासून वंचित ठेवू नये. दौऱ्यानंतर शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया वेगात सुरू झाली असून, दिवाळीपूर्वीच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दौऱ्यात अंबासनचे माजी सरपंच डॉ. सुभाष भामरे, तात्याभाऊ भामरे, डॉ. दिनेश बच्छाव, माजी जि.प. सदस्य गुलाबराव कापडनीस, ज्येष्ठ नेते प्रकाश देवरे, खेमराज कोर, अशोक सावंत, प्रवीण सावंत, किशोर कदम, विनोद सावंत, सुभाष शिंदे, विनोद पाटील, प्रवीण अहिरे, अरुण कोर, जितेंद्र सूर्यवंशी, प्रेमराणा मगर, चंद्रकांत कोर, मधुकर सोनवणे, जयवंत ठाकरे, गणेश गायकवाड, शशिकांत कोर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!