येवला-लासलगाव मतदारसंघातून मुंबई आंदोलकांसाठी ‘एक भाकर समाजासाठी’ या उपक्रमातून मदतीचा हात

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२५ ऑगस्ट २०२५ :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.२९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विराट आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या लाखो मराठा बांधवांची जेवणाची सोय व्हावी, उपाशीपोटी कोणीही मागे राहू नये, यासाठी ‘एक भाकर समाजासाठी’ या उपक्रमातून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. येवला-लासलगाव मतदारसंघातही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, मराठा बांधवांनी एकदिलाने आंदोलनासाठी यशस्वी नियोजन केले आहे.
भरवस फाटा येथे नुकतीच सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शाहूराजे शिंदे, सचिन आहेर, प्रवीण कदम, शिवा सुराशे, गोपीनाथ ठुबे, केदार नवले, प्रसाद फापाळे, पंडित मुदगुल, राकेश फापाळे, पवन फापाळे, विक्रम शिंदे, दत्ता दरेकर, अभिजीत डुकरे, अमित मुदगुल, संदीप फापाळे, केदार फापाळे, योगेश भोसले, हर्षल काळे, तुषार थेटे, विजय मुदगुल आदींसह अनेक मराठा बांधव उपस्थित होते. सर्वांनी जरांगे पाटील यांच्यासोबत शेवटपर्यंत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत आंदोलनस्थळी कोणीही उपाशी राहू नये, यासाठी गावागावातून भाकरी व चटणी/भाजी जमा करून मुंबईकडे रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला. दि.२९ ऑगस्टपासून सर्व तालुक्यातून जमा झालेल्या भाकरी मुंबईला पोहचणार आहेत.
हा उपक्रम फक्त जेवणापुरता मर्यादित नसून, संपूर्ण मराठा समाजाच्या एकतेचे आणि परस्पर सहकार्याचे प्रतीक आहे. ‘पाटलांनी सांभाळावं मराठ्यांना आणि मराठ्यांनी सांभाळावं पाटलांना’ हा संदेश देत प्रत्येकजण आंदोलनाचा अविभाज्य भाग होत आहे.
एक भाकरी देणे म्हणजे फक्त पोटाची सोय नव्हे, तर लढणाऱ्या बांधवांना भावनिक आणि नैतिक आधार देणे आहे. या सामूहिक प्रयत्नांमुळे मुंबई आंदोलन अधिक जोमाने पार पडेल आणि मराठा समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठीच्या संघर्षात यशस्वी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



