अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
महाविकास आघाडीचे देवळा तहसीलदारांना निवेदन

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; महाविकास आघाडीचे देवळा तहसीलदारांना निवेदन
मनोज वैद्य/ देवळा
देवळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा सरसकट पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, देवळा तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली, त्यात मका, लाल कांदे, कांदे रोप, बाजरी, सोयाबीन आदी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी महागडे उन्हाळी बियाणे खरेदी करून रोप तयार करण्यासाठी टाकले आहे
तसेच काढणीला आलेला मका, बाजरी आदी पिक या पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला गेला आहे याची शासनाने दखल घ्यावी, यासाठी बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी देवळा येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पंडितबापू निकम, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रशांत शेवाळे, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष दिनकर आहेर, दिलीप पाटील, जितेंद्र आव्हाड मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, नारायण जाधव, मयूर देवरे, वैधव देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.



