नाशिक ग्रामीण
शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत देवळा तहसीलदारांचा भऊरमध्ये लोकसंवाद ; विविध दाखल्यांचे वाटप

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून आज मंगळवार, दि. ५ रोजी देवळ्याचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी भऊर गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी केले.
यावेळी आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रकरणांची पाहणी केली. विविध शासकीय दाखल्यांचे जागेवर वाटप, ग्रामस्थांनी मांडलेल्या शेत रस्ते, पांदण रस्त्यांचे वाद, सातबारा व फेरफार मधील त्रुटी, वारस नोंदी, यांसारख्या समस्या त्यांनी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण यासारखाय शासकीय योजनांच्या अडचणींचेही निराकरण करण्यात आले. अनेक तक्रारींवर त्यांनी जागेवरच तोडगा काढत संबंधित कर्मचाऱ्यांना गतीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. ज्या नागरिक या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत तसेच ज्यांना आज समस्या मांडणे शक्य झाले नाही त्यांनी स्थानिक सर्कल, तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करून या अभियानाचा लाभ घेण्याचे देखील आवाहन तहसीलदार यांनी केले.
तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी आतापर्यंत मंडलनिहाय तालुक्यातील सहा गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील प्रश्नांचा निपटारा केला आहे. “प्रशासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करून शासकीय सेवा पारदर्शकपणे लोकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तलाठी पुनम आहिरे यांनी देखील स्व-जनगणना सह अन्य योजनांची माहिती यावेळी दिली. आभार प्रदर्शन पत्रकार बाबा पवार यांनी केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे, काशिनाथ पवार, रविंद्र पवार, खंडू माळी, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, पोलीस पाटील भरत पवार, कॉग्रेस तालुका अध्यक्ष दिनकर निकम, संजय पवार, दौलत पवार, उमेश पवार, योगेश पवार, ऋषिकेश जोंधळे, बापू गरुड, संदीप पवार, विष्णू गोसावी, दिगंबर निकम, जिभाऊ गरुड, लखन गरुड तसेच गावातील नागरिक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



