नाशिक ग्रामीण

योगगुरू बाळासाहेब मोकळ यांना ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार’ जाहीर

Nandgaon news

योगगुरू बाळासाहेब मोकळ यांना ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार’ जाहीर

वेगवान मराठी दि 11 August2026

शिक्षण क्षेत्रासोबतच योगक्षेत्रात उल्लेखनीय, समर्पित व प्रेरणादायी कार्य करणारे योगदर्शन योग केंद्राचे अध्यक्ष योगगुरू बाळासाहेब मोकळ यांची ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार २०२६–२०२७’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम (NHRPC Forum) यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्ञानाचा प्रसार, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच समाज आणि राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवांची दखल घेत योगगुरू बाळासाहेब मोकळ यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
योगगुरू बाळासाहेब मोकळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्यपूर्ण कार्य केले आहे. योगदर्शन योग केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी व योगसाधकांना योगाचे प्रशिक्षण दिले असून, अनेक योग शिक्षक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले योग शिक्षक आज विविध ठिकाणी योगाचा प्रसार करीत आहेत.
तसेच अनेक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्थांमध्ये योगाचे प्रशिक्षण व योगशिबिरांचे आयोजन करून योग जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या योगप्रचारामुळे अनेक नागरिक योगसाधनेकडे वळले असून, नियमित योगाभ्यासाच्या माध्यमातून अनेकांना आपल्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये सुधारणा अनुभवता आली आहे.
योग, प्राणायाम, योगासन आणि निरोगी जीवनशैली याबाबत जनजागृती करताना ‘योग प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे’ या भावनेतून त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण करून त्यांच्यात शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी योगाचा उपयोग करून घेण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.
त्यांच्या या प्रदीर्घ योगसेवेची, शैक्षणिक योगदानाची आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान जाहीर झाल्याने नाशिकच्या योगक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरस्कार समारंभ रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता Eatos Imperial, 4&K, Akash Mogra, Nalwa Road, Nandurbar (महाराष्ट्र) येथे होणार आहे.
योगगुरू बाळासाहेब मोकळ यांच्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडीबद्दल योगप्रेमी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध सामाजिक संस्था आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!