नाशिक ग्रामीण

‘चोरावर मोर’ बनणे अंगलट; पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या विठेवाडीतील तरुणांचा लेखी माफीनामा!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून वसुली करायची आणि नंतर पोलिसांवरच निष्काळजीपणाचा आळ आणायचा, असा एक धक्कादायक आणि अजब प्रकार देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे समोर आला आहे. मात्र, खाकीने तपासाचा वेग वाढवताच या ‘चोरावर मोर’ बनलेल्या तरुणांचे बिंग फुटले असून कायदेशीर कारवाईच्या भीतीने ग्रामस्थांनी पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर करत आपली सुटका करून घेतली आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यातील मटाणे शिवारामधून बीएसएनएल (BSNL) कंपनीचा एक लोखंडी खांब चोरीला गेला होता आणि या चोरीबाबत देवळा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, रविवारी (दि. ३१) रात्री पावणे अकराच्या सुमारास दोन चोरटे एका रिक्षातून हा चोरीचा लोखंडी पोल घेऊन विठेवाडी गावाच्या मार्गाने जात असताना गावातील काही तरुणांनी सतर्कता दाखवून या दोन्ही चोरट्यांना मुद्देमालासह रंगेहात पकडले.
चोरट्यांना पकडल्यानंतर या तरुणांनी पोलिसांना कळवण्याऐवजी त्यांना ओलीस ठेवले आणि पोलिसांचा धाक दाखवत त्यांच्याशी रात्रीतूनच गुप्त तडजोड (सेटलमेंट) करून चोरट्यांना सोडून दिले. स्वतःचा हा ‘बनाव’ लपवण्यासाठी या तरुणांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना फोन करून चोरट्यांची माहिती दिली; मात्र ‘पोलीस उशिरा पोहोचल्यामुळे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले’, असा खोटा कांगावा केला. या तरुणांच्या खोट्या प्रचारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर तालुक्यात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, देवळा पोलिसांनी या चोरीच्या गुन्ह्यातील एका मुख्य संशयित आरोपीला बेड्या ठोकताच संपूर्ण प्रकरणाची पोलखोल झाली.

आरोपीच्या चौकशीत विठेवाडीतील तरुणांनीच आर्थिक तडजोड करून आपल्याला सोडून दिल्याची कबुली दिली. आपले पितळ उघडे पडल्याचे समजताच आणि पोलिसांकडून कडक कायदेशीर कारवाईचा इशारा मिळताच संबंधित तरुणांचे धाबे दणाणले. आपली चूक मान्य करत विठेवाडी येथील त्या १८ ग्रामस्थांनी तातडीने देवळा पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांची लेखी माफी मागितली.  ‘भविष्यात अशी चूक किंवा बेकायदेशीर कृत्य पुन्हा घडणार नाही’, अशी हमी देखील त्यांनी या माफीनाम्यात दिली आहे. पोलिसांनाच गोत्यात आणू पाहणाऱ्या या अतिशहाण्या तरुणांची आता संपूर्ण देवळा तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!