नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; रुग्णवाहिका उशिराने आल्याने जख
Nandgaon news
नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; रुग्णवाहिका उशिराने आल्याने जखमीचा मृत्यू
वेगवान मराठी : मारुती जगधने
7 मे 2026
नांदगाव : नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ जे वर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना नांदगाव-मनमाड रोडवरील फुलेनगर हद्दीतील म्हसोबावाडी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मर्यादित वेगाने आपल्या दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक पोलीस पाटील सचिन खैरनार तसेच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
मात्र, रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने जखमीला उपचारासाठी नेण्यास मोठा विलंब झाला. अखेर खासगी वाहनाच्या मदतीने जखमीला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून संबंधितास मृत घोषित केले. रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्यामुळेच या व्यक्तीचा जीव गेल्याची भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावर अनेक वाहने अतिवेगाने धावत असल्याने वारंवार गंभीर अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अपघातप्रवण ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत तसेच “मर्यादित वेग” दर्शविणारे फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याशिवाय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात घडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी या झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वार आणि पादचारी धोक्यात आले आहेत.
महामार्गावरील दुभाजकांमध्ये तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडेही पाण्याअभावी सुकत चालली आहेत. संबंधित राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती विभागाकडून या समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, नांदगाव नगर हद्दीतील फुलेनगर, श्रीरामनगर तसेच गंगाधरी परिसरातील पथदिवे आणि पादचारी मार्ग अनेकदा बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व्यवस्था करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
तसेच नांदगाव शहरातील वर्धमान हॉस्पिटल परिसरात भुयारी गटारी बंद पडल्याने राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने सांडपाणी साचत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वाहनधारक, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची वाढ होत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन गटार व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात घडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.अपघात मागील पाच दिवसापूर्वी घटना आहे .



