नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

चोरीच्या घटना : तातडीच्या आणि ठोस उपाययोजनांची गरज केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अधिक गरजेचे आहे.

Nandgaon news

 चोरीच्या घटना : तातडीच्या आणि ठोस उपाययोजनांची गरज केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अधिक गरजेचे आहे.

वेगवान मराठी :  मारुती जगधने
दिनांक : 9 मार्च 2026
नांदगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. रात्रीच्या वेळी घडणाऱ्या या घटनांमुळे व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास  कांदे यांच्या सूचनेनुसार शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, व्यापारी आणि नागरिक यांची बैठक घेण्यात आली, ही सकारात्मक बाब मानावी लागेल.
कोणत्याही शहराच्या विकासासाठी नागरिकांचा सुरक्षिततेवरील विश्वास महत्त्वाचा असतो. जर नागरिकांना आपल्या घरात, दुकानात किंवा रस्त्यावर सुरक्षित वाटत नसेल, तर त्या शहराच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. नांदगावमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांनी हा विश्वास डळमळीत होत असल्याचे दिसून येत आहे.
बैठकीत व्यापारी व नागरिकांनी आपले अनुभव मांडले आणि पोलीस प्रशासनानेही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पावले निश्चितच महत्त्वाची आहेत; मात्र ती केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अधिक गरजेचे आहे.
 शहरात नियमित गस्त वाढवणे, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करणे आणि नागरिकांशी सतत संवाद ठेवणे अशा उपाययोजनांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
यासोबतच नागरिक आणि व्यापारी वर्गानेही जागरूक राहणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाला योग्य वेळी माहिती देणे, परिसरातील सुरक्षा उपाय वाढवणे आणि परस्पर सहकार्याची भावना ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
नांदगावमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. बैठकीत झालेल्या चर्चा आणि दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरली, तरच नागरिकांचा विश्वास पुन्हा दृढ होईल आणि शहरात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
नांदगावमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांवर आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी बैठक
नांदगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास  कांदे यांच्या सूचनेनुसार नांदगाव येथील आमदार निवासस्थानी शासकीय अधिकारी, व्यापारी वर्ग व नागरिकांची बैठक घेण्यात आली.
बैठकीस सौ. अंजुमताई  कांदे, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान  खान, नांदगाव शहराचे नगराध्यक्ष सागर  हिरे, डीवायएसपी  बाजीराव महाजन, अप्पर पोलीस निरीक्षक संधू तसेच नांदगाव-मनमाड शहराचे पोलीस निरीक्षक, एलसीबीचे अधिकारी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान व्यापारी व नागरिकांनी अलीकडील चोरीच्या घटनांबाबत आपले अनुभव आणि तक्रारी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी अंजुमताई कांदे व फरहान  खान यांनी पोलीस विभागाने तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. तसेच नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव पोलीस प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न करता नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी, असे सांगितले.
डीवायएसपी महाजन यांनी यावेळी सांगितले की, त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांमधून प्रत्येकी दोन पोलिसांचा समावेश असलेली एक टास्क फोर्स लवकरच तयार करण्यात येणार असून ही टीम चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठी काम करणार आहे. लवकरच परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी आश्वासन दिले.
अप्पर पोलीस निरीक्षक संधू यांनीही स्थानिक पोलीस प्रशासनाला या प्रकरणात अधिक लक्ष घालण्याच्या सूचना देत लवकरच शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
बैठकीनंतर फरहान  खान व सागर हिरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील चोरी झालेल्या घटनास्थळांना भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!