निफाड तालुक्यातील विष्णूनगर येथील गट्टू कंपनीत भीषण आग; निफाड, चांदवड, मनमाड अग्निशामक दलाची तत्काळ धाव

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक १० डिसेंबर २०२५ :- विंचूरजवळील विष्णूनगर (गट क्र. ६७) येथील गट्टू उत्पादन कंपनीत आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून हजारो रुपयांच्या मक्याच्या बिट्या जळून खाक झाल्या. डॉक्टर सचिन जेऊघाले यांच्या मालकीची ही कंपनी चांदवड येथील वर्धमान छाजेड हे भाडे तत्वावर चालवत आहेत.
कंपनी परिसरात बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणावर मक्याच्या बिट्यांचा साठा ठेवण्यात आला होता. पहाटे अचानक या मोठ्या ढिगाऱ्यातून धूर निघू लागल्याचे कामगारांच्या निदर्शनास आल्यानंतर घटनास्थळी धाव घेण्यात आली. प्रारंभी लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाच्या टँकरने आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. यानंतर निफाड, चांदवड आणि मनमाड येथील अग्निशामक दलाचे तीन बंब दाखल होऊन संयुक्तरीत्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णतः आटोक्यात आणण्यात यश आले.
या घटनेत काही लाखो रुपयांच्या मक्याच्या बिट्या जळून नुकसान झाले असून, आग लवकर लक्षात आल्यामुळे मोठा साठा बचावला असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली. दरम्यान, लासलगाव पोलिस ठाण्याचे हवालदार डी. डी. जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



