बैलाच्या पोटात सोन्याची अंगठी, काय आहे बातमी!

वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगांव [ दि 24 ऑगस्ट 2025 ]
जातेगाव (ता. नांदगाव) – शेतकऱ्यांच्या पोळ्याच्या उत्सवात बैलांना पूजन, सजावट व लाड केले जातात. परंतु यंदा जातेगावच्या शिंदे कुटुंबातील पोळा आगळा–वेगळा ठरला. कारण सर्जा–राजा या बैलजोडीतील ‘राजा’ नावाच्या बैलाने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी एकदिवस उपवास धरावा लागला ही घटना चर्चेचा विषय ठरली.
काय घडलं?
शेतकरी प्रकाश गोविंद शिंदे यांच्या सर्जा–राजा नावाच्या बैलांना पोळ्याच्या दिवशी (22 ऑगस्ट) स्नान–सजावट करून औक्षण करण्यात आले. शेजारी भाऊ विजय शिंदे यांच्या घरीही पूजनासाठी नेण्यात आले. त्यावेळी विजय यांच्या पत्नी पार्वताबाई यांनी औक्षण करताना पतीची दीड तोळ्याची सोन्याची अंगठी पूजन साहित्याबरोबर ठेवली. परंतु पूजनानंतर अंगठी गायब झाली.
शंका आणि शोधमोहीम
सगळीकडे शोधूनही अंगठी न सापडल्याने ती बैलांनीच गिळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.बैलांच्या शेणातून अंगठी बाहेर न पडल्याने अखेर डॉक्टरांच्या सल्ल्याने बैलांना एक दिवस उपास धरायला भाग पाडले .
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल देवकर, डॉ. नवनाथ ताठे यांना माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी मेटल डिटेक्टरच्या साह्याने तपासणी केली असता अंगठी राजा बैलाच्या पोटात असल्याचे स्पष्ट झाले.
दोन तासांची शस्त्रक्रिया
डॉक्टरांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी संध्याकाळी दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेतून राजाच्या पोटातून दीड तोळे वजनाची सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी 40 टाके घालावे लागले.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निर्देश
राजा बैलाला स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवणे, डास–माशांपासून संरक्षण करणे, पंधरा दिवस बैलाला शेतीकामास लावू नये असे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.
गावभर चर्चा
सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीची अंगठी सुरक्षित मिळाल्याने शिंदे कुटुंबाने दिलासा घेतला. मात्र सोन्याची अंगठी गिळणाऱ्या राजामुळे संपूर्ण तालुक्यात ही घटना चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
सारांश: पोळ्याच्या उत्सवात सोन्याच्या अंगठीमुळे बैलांना उपवास धरावा लागला आणि अखेर डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेनंतर अंगठी परत मिळाल्याने “सोन्याची अंगठी आणि सर्जा–राजा” ही कहाणी सर्वांसाठी आगळीवेगळी ठरली.



