निफाडमध्ये घरासमोरून ठेकेदाराची स्विफ्ट कार चोरी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक १० डिसेंबर २०२५ :- निफाड शहरातील गणेशनगर भागातील ठेकेदाराची घरासमोर उभी केलेली स्विफ्ट कार रात्रीच्या सुमारास काच फोडून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
दत्तात्रय शंकर महाजन (धंदा – कॉन्ट्रॅक्टर, रा. गणेशनगर, निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या दैनंदिन वापरातील मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट (क्र.एम.एच.१५ डी.एम.८६४३) ही कार दि.९ डिसेंबर रोजी रात्री कुटुंब झोपल्यावर घरासमोर पार्क केली होती. दि.१० डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादींची पत्नी प्रमिला यांनी घराबाहेर पाहणी केली असता कार गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ फिर्यादींना माहिती दिली. फिर्यादी महाजन यांनी गाडी उभी केलेल्या ठिकाणी पाहणी केली असता कारची काच फुटलेली खाली पडलेली दिसली. फिर्यादी, त्यांचे भाऊ बबन महाजन, तसेच सुनिल भाबड व रमेश सानप यांनी परिसरात शोध घेतला; मात्र कार मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याने काच फोडून वाहन चोरी केल्याची खात्री झाली. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. नितीन सांगळे अधिक तपास करीत आहेत.



