लोकल बातम्या
देवळा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दिनकर देवरे; सचिवपदी संजीव आहेर

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : रोटरी क्लब ऑफ देवळा टाउनचा पदग्रहण समारंभ तसेच उमराणे व चांदवड येथील नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लबचा संयुक्त पदग्रहण सोहळा दुर्गामाता मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर होते. माजी प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, उपप्रांतपाल उमेश सोनी, प्रा. सचिन देवरे आणि नगराध्यक्षा भाग्यश्री आहेर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ देवळा टाउनच्या अध्यक्षपदी दिनकर देवरे व सचिवपदी संजीव आहेर यांनी पदभार स्वीकारला. माजी अध्यक्ष सुनील आहेर यांनी पदभार हस्तांतरित केला. तसेच उमराणे व चांदवड येथील नव्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांनाही रोटरी कॉलर, चार्टर, हॅमर व पिन देऊन पदग्रहण करून देण्यात आले.
अॅड. रितेश निकम यांनी नव्या कार्यकारिणीच्या आगामी वर्षातील उपक्रमांचा संकल्प मांडला. प्रा. सचिन देवरे यांनी “चला आनंद शोधूया” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, एनडीएमधून लेफ्टनंट झालेल्या श्रीनीत आहेर, वायुदलातील फ्लाइंग ऑफिसर प्रज्वल सूर्यवंशी तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान आहेर यांनी केले, तर सचिव संजीव आहेर यांनी आभार मानले.



