
जळगाव बुद्रुक येथे विहिरीत पडून दोन काळवीटांचा मृत्यू – परिसरात हळहळ
वेगवान मराठी : मारुती जगधने
जळगाव बुद्रुक (दि. 18 नोव्हेंबर 2025) – जळगाव बुद्रुक शिवारात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत दोन काळवीटांचा मृत्यू झाला. शेतकरी ज्ञानेश्वर भागोजी वाघ यांच्या गट क्र. 34/3 मधील स्वमालकीच्या विहिरीत हे दोन्ही मृत काळवीट आढळले.
घटना कशी उघडकीस आली?
शेतात पाणी भरण्यासाठी मोटारपंप चालू करण्यासाठी गेलेल्या वाघ यांनी विहिरीत दोन मृत हरणांचे पडलेले शव पाहिले. तत्काळ त्यांनी स्थानिक प्राणीमित्र प्रभाकर निकुंभ यांना माहिती दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर निकुंभ यांनी हे दोन्हीही प्राणी काळवीट (Blackbuck) असल्याचे निश्चित करून वनविभागाला कळवले.
वनविभागाची तात्काळ कारवाई
नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अण्णासाहेब टेकनर, तसेच अन्य वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने दोन्ही काळवीटांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि पुढील शासकीय नियमांनुसार मृतदेह नांदगाव येथे अंतिम विल्हेवाटीसाठी हलवण्यात आले.
घटनास्थळी उपस्थित
लव्हा कांदे, किसन गावंडे, चिंदा गावंडे यांच्यासह अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी या कामात मदत केली.
या काळवीटांची जोडी मागील अनेक वर्षांपासून आसपासच्या परिसरात आपल्या कळपात वास्तव्य करून होती. त्यांच्या अचानक मृत्यूने गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
का झाली असेल काळवीटांची झुंज? – तज्ञांची माहिती
वन्यजीव संरक्षण संस्था, नांदगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर निकुंभ यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे—
वर्चस्व आणि प्रजननाची स्पर्धा
काळवीटांमध्ये नरांमध्ये प्रजननासाठी तसेच कळपावरील नेतृत्व मिळवण्यासाठी तीव्र झुंज होत असते.
जो नर जिंकतो त्यालाच प्रजननाची संधी मिळते.
. एकाच कळपात दोन प्रबळ नर राहू शकत नाहीत
काही प्रजातींमध्ये दोन प्रबळ नर एकत्र राहणे शक्य नसते. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष अनिवार्य ठरतो.
. लढाईचा प्रकार
काळवीट आपल्या मजबूत शिंगांचा वापर करून एकमेकांवर जोरदार प्रहार करतात. या लढाया अत्यंत धोकादायक आणि तीव्र असतात.
अपघातास कारणीभूत परिस्थिती
लढाईच्या भरात आजूबाजूचे भान सुटल्याने –
- विहीर,
- दरी,
- अथवा इतर खोल जागा
याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे दोघे एकाच वेळेस खाली कोसळून मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. या घटनेतही अशीच परिस्थिती उद्भवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.: प्राणी मित्र : प्रभाकर निकुंभ
दरम्यान १७ नोव्हेंबर 2025 रोजी नांदगाव मनमाड नॅशनल हायवे वरती ईश्वर वारी नजर फुलेनगर हद्दीमध्ये रात्री सोहळ्याला रस्ता ओलांडताना भरदा वाहनाने एका काळवटीला जोरदार धडक मारल्याने सदर काळवीट रस्त्यावरच प्राण गत झाले नंतर वन विभागाने सदर काळविटाची दरीतसर विल्हेवाट लावली या परिसरामध्ये सातत्याने काळवीट रस्ता ओलांडत असतात त्यासाठी या ठिकाणी गतिरोधकांची मागणी होत आहे .



