द्राक्षे शेतीतून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या: द्राक्षे पंढरीत खळबळ

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद :- द्राक्षे शेतीतून उध्वस्त झालेल्या उगाव ता.निफाड येथील शेतकऱ्याने आज दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. सततच्या तोट्यांमुळे आणि वाढत्या कर्जाच्या भारामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सधन मानल्या जाणाऱ्या द्राक्षे शेतीला कोरोना काळापासून ग्रहण लागले असून आता द्राक्षे उत्पादकही आत्महत्या करू लागल्याने द्राक्षे पंढरीत खळबळ उडाली आहे.
उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे (वय ४५) हे आज सकाळी ८.३० च्या सुमारास द्राक्षे बागेत फेरफटका मारत असतांना त्यांना द्राक्षे बागेची उध्वस्त परिस्थिती पहावली नाही. त्यामुळे त्यांनी द्राक्षे बागेचे विषारी औषध सेवन केले. कुटुंबियांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांना तातडीने निफाड ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
संबंधित शेतकऱ्यावर बँक, सोसायटी व सावकारी कर्ज होते. हा द्राक्षे हंगाम चांगला जाऊन आपण कर्जमुक्त होऊ अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, द्राक्षे बागेची परिस्थिती पाहून सात आठ दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. राज्य सरकारने नुकसानग्रस्त द्राक्षे पिकाचे सप्टेंबर महिन्यात द्राक्षे माल नसतांना पंचनामे केले व त्या आधारे तुटपुंजी मदत केली. त्यामुळे द्राक्षे हंगाम सुरू झाल्याने सरकारने फेर वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, कर्जमाफी करावी अशी मागणी होत आहे.
@ उगावसारख्या द्राक्षपंढरीत घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा केला आहे. द्राक्षबागांतील या विषारी चक्रातून शेतकरी बाहेर येणार कधी? द्राक्षे उत्पादकांना सरकारने आधार न दिल्यास अशी आत्महत्यांची साखळी वाढू शकते.
वाल्मीक सांगळे
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, रयत क्रांती संघटना



