“कॅश भीक देणं बंद” – महाराष्ट्रात नवी जनचळवळ सुरू
वेगवान मराठी : मारुती जगधने
मुंबई/पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२५ :
संपूर्ण महाराष्ट्रात “CASH भीक देणं बंद” ही आगळीवेगळी सामाजिक चळवळ सुरू झाली आहे. या उपक्रमानुसार आता भिकाऱ्यांना पैसे न देता, त्यांना अन्न व पाणी देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर शहरांमध्ये या मोहिमेचा व्यापक प्रसार होत असून, “भिकाऱ्यांना अन्न आणि पाणी देऊ, पण कॅश देणार नाही” हा घोष समाजमाध्यमांवर जोर धरू लागला आहे.
या मोहिमेमागील उद्दिष्ट म्हणजे — भिकारी टोळ्यांचा अंत करणे, तसेच लहान मुलांचे अपहरण व भिक मागविण्याचे रॅकेट मोडीत काढणे. अनेकदा भिक मागण्याच्या आडून कार्यरत गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक मदत नकळतपणे मिळत असल्याने, ही साखळी तोडण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या जनजागृती मोहिमेबाबत श्री गजानन बा. साळोखे, सचिव – आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायीक महासंघ (पश्चिम महाराष्ट्र) यांनी सांगितले की,
“आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे – भिकाऱ्याला पैसा नव्हे तर अन्न-पाणी द्यायचं. त्यामुळे समाजात खऱ्या अर्थाने बदल घडेल.”
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, गाडीत बिस्किटांचे पुडे किंवा पाण्याच्या बाटल्या ठेवून गरजू व्यक्तींना द्याव्यात, परंतु रोख पैसा देऊ नये.
या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत असून, अनेक समाजसेवी संस्था आणि विद्यार्थीवर्ग यामध्ये सहभागी होत आहेत.



