कांद्याच्या दरात घसरण सुरूच शेतकरी वर्गावर आर्थिक संकट; हमीभाव आणि नुकसानभरपाईची मागणी
कांद्याच्या दरात घसरण सुरूच शेतकरी वर्गावर आर्थिक संकट; हमीभाव आणि नुकसानभरपाईची मागणी

वेगवान मराठी :एकनाथ भालेराव
येवला :दिनांक : 16 सप्टेंबर 2025
सध्या कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असून शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड आर्थिक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल दराने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नाही.
लाखो टन कांदा चाळीत पडून खराब होत चालल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.
सामाजिक कार्यकर्ता आणि सायगाव ग्रामपंचायत सदस्य सौ. योगिता निघुट यांनी या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून कांद्याच्या निर्यात करणे, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आणि नुकसानभरपाई ची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना कांदा रोप टाकणे, लागवड, पीक तयार करणे, खते आणि साठवणुकीसाठी लाखोंचा खर्च करावा लागतो, मात्र बाजारात मिळणारा दर अत्यंत तुटपुंजा आहे.
चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे, परंतु अनियमित हवामान बदलांमुळे साठवलेला कांदा झपाट्याने सडू लागला आहे.
साठवलेल्या कांद्याच्या खराबीमुळे हाताळताना शेतकऱ्यांना हजारी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते.
मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली दरातील घसरण आणि वाढता मजुरी खर्च यामुळे उत्पादनाचा खर्चही निघत नाही.
यामुळे घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कर्जफेड अशा सर्व जबाबदाऱ्यांवर मोठा परिणाम होत असून शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.
“राज्य व केंद्र शासनान सकारात्मक पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अनुदान, हमीभाव, साठवणूक सुविधा आणि नुकसानभरपाईचा निर्णय करावा ”
सौ. योगिता निघुट



