एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघे रंगेहात जेरबंद
वेगवान मराठी : मारुती जगधने 13 जून 2026
नांदगाव , दि. 13जून 2026: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नाशिकच्या पथकाने नांदगाव येथे दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खाजगी इसमांना रंगेहात पकडून भ्रष्टाचाराविरोधातील आणखी एक यशस्वी कारवाई केली आहे.
या प्रकरणात इक्सेरे धारीसिंग बाबूलाल राठोड आणि सागर राजेंद्र बोरसे या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष पेलकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी यापूर्वी विक्री केलेल्या शेतजमिनीच्या खरेदीखत दस्तावेजांच्या प्रमाणित नकला मिळविण्यासाठी नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी संबंधित आरोपींनी सुरुवातीला १,२०० रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या तडजोडीनंतर लाचेची रक्कम १,००० रुपये निश्चित करण्यात आली.
दरम्यान, फिर्यादी यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. नियोजनानुसार आरोपींनी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष पेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, सरकारी कार्यालयांतील कामांसाठी कोणत्याही प्रकारची लाच मागितली जात असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



